” तेव्हा मी ढसाढसा रडलो…”, निवृत्तीचा निर्णय घेताच अजिंक्य रहाणेला पहिला फोन कुणाचा आला?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या कसोटी संघाचा आधारस्तंभ आणि अनेक ऐतिहासिक विजयांचा शिल्पकार असलेल्या अजिंक्य रहाणेने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या काही काळापासून तो हिंदुस्थानच्या संघातून बाहेर होता. त्याच्या या निर्णयामुळे हिंदुस्थानी क्रिकेटमधील एका सुवर्ण अध्यायाचा अंत झाला आहे. या अत्यंत कठीण निर्णयानंतर आपल्याला सर्वात पहिला फोन कुणाचा आला आणि सहकारी खेळाडूंची काय प्रतिक्रिया होती, याबद्दल रहाणेने स्वतः खुलासा केला आहे.

निवृत्तीच्या घोषणेनंतर ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना रहाणेने सांगितले की, त्याचा हा निर्णय जाहीर होताच सर्वात आधी हिंदुस्थानचा महान फलंदाज, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा फोन आला होता. सचिन पाजी रहाणेच्या या निर्णयामुळे काहीसे निराश झाले होते. कारण रहाणेने टीम इंडियासाठी अजून काही काळ खेळावे अशी त्यांची इच्छा होती.

मला सर्वात पहिला फोन सचिन पाजींचा आला. मी अजून काही काळ खेळायला हवे होते, असे त्यांचे म्हणणे होते. पण मी त्यांना स्पष्ट सांगितले की, मला माझे करिअर विनाकारण पुढे लांबवायचे नव्हते. मी कोणत्याही पश्चात्तापाशिवाय निवृत्त होत आहे. सचिन पाजींशिवाय इरफान पठाणनेही मला कॉल केला, तर चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी मेसेज करून शुभेच्छा दिल्या. मी प्रत्येकाला एकच गोष्ट सांगितली की, मी खूप समाधानी आहे, कारण मी देशासाठी माझे शंभर टक्के योगदान दिले आहे.”

रोहितवर प्रश्नचिन्ह नको, थेट वर्ल्ड कपचे तिकीट द्या! रहाणेचा निवड समितीला सल्ला

“व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर मी खूप रडलो…”

निवृत्तीच्या घोषणेचा व्हिडिओ शूट करतानाचा भावूक प्रसंग सांगताना रहाणे म्हणाला, “निवृत्तीचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर मी ढसाढसा रडलो. कुटुंबाशी या विषयावर बोलताना मी आधीच भावुक झालो होतो, पण रेकॉर्डिंग करताना त्याचा माझ्यावर एवढा खोल परिणाम होईल, याची कल्पना मी केली नव्हती. ज्या खेळावर मी वर्षानुवर्षे जीवापाड प्रेम केले, तो खेळ आता मी पुन्हा देशासाठी खेळणार नाही, ही वस्तुस्थिती खूप वेदनादायी होती. संपूर्ण रेकॉर्डिंगदरम्यान तीच भावना माझ्या मनात घर करून होती.”

परदेशी भूमीवरील संकटमोचक

अजिंक्य रहाणेने प्रदीर्घ काळ हिंदुस्थानी संघाचे प्रतिनिधित्व केले. खासकरून कसोटी क्रिकेटमध्ये तो हिंदुस्थानी फलंदाजीचा पाठीचा कणा मानला जायचा. कठीण परिस्थितीत आणि परदेशी खेळपट्ट्यांवर त्याने अनेक मॅच-विनिंग खेळी खेळल्या. कर्णधार म्हणूनही त्याने हिंदुस्थानी संघाचे यशस्वी नेतृत्व केले, ज्यामध्ये 2020-21 मधील ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक बॉर्डर-गावस्कर करंडक विजय नेहमीच स्मरणात राहील.

रहाणेच्या हस्तक्षेपाने बदलले जैसवालचे भविष्य; सामनाधिकाऱ्यांनी काढला होता चार सामन्यांच्या बंदीचा फतवा