
मुंबईतील घाटकोपरच्या गौसिया चाळ परिसरात डोंगराचा भाग कोसळ्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेदरम्यान दोन ते तीन घरांवर दरड कोसळली असून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, एनडीआरएफ, अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
Mumbai, Maharashtra: The rescue operation is underway following a landslide in Ghatkopar. Two more bodies have been recovered, taking the total number of bodies recovered from the site to four pic.twitter.com/Iem8vHjEtH
— IANS (@ians_india) August 12, 2026
एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. तब्बल 7 तासांपासून बचावकार्य सुरू असून ड्रोनच्या सहाय्याने ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध सुरू आहे. त्यामुळे मृत्तांच्या संख्येत वाढ होण्य़ाची शक्याता बचाव पथकाकडून वर्तवली जात आहे.
नेमकी घटना काय?
घाटकोपरमधील अशोक नगरच्या गौसिया चाळ येथे डोंगर कोसळ्य़ाची मोठी दुर्घटना घडली. पहाटे तीन ते चारच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे डोंगरावरील 12 ते 13 फुटाचा दगड दोन ते तीन घरांवर कोसळला असून यामध्ये अनेक जण अडकले असल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून अजून काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ड्रोनच्या सहाय्याने हे बचावकार्य अद्यापही सुरूच आहे.
मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि स्थानिक नगरसेवकांनी दुर्घटनास्थळाचा आढावा घेतला असून दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पालिकेकडून 3 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
जखमींची नावे-
1)सोहेल अन्सारी (18)
2) मोहम्मद अन्सारी (14)
3) नईमुद्दीन एकबाल (28)
4) साजिद अन्सारी वर्षे (16)
मृतांची नावे-
1) मोहम्मद समीर अन्सारी (14)
2) साहिल हुसेन अब्दुल काझी (19)
3) अज्ञात (45)
4) अबान आरिफ शेख (2)
5) मनत आरिफ शेख (4)
6) मर्जिना आरिफ शेख (27)
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या या घटनेने झोपडपट्टी आणि चाळींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. प्रशासनाकडून बचाव कार्य वेगाने सुरू असले, तरी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या इतर नागरिकांना लवकरात लवकर सुरक्षित बाहेर काढण्याचे मोठे आव्हान यंत्रणेसमोर आहे.































































