
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पेढे-परशुराम परिसरातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेला प्रसिद्ध सवतसडा धबधबा पाऊस सुरू होताच पर्यटकांना खुणावू लागतो. मात्र, या पर्यटनस्थळाकडे जाणारी वाट अत्यंत बिकट, निसरडी आणि झाडाझुडपांनी वेढलेली असल्याने पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासकीय व ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे लाखो रुपयांचा विकासनिधी परत गेल्याने येथील मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पाऊस पडण्यास सुरुवात होताच लक्षवेधी ठरणाऱ्या या धबधब्याकडे पर्यटकांसह स्थानिकांची पाऊले आपोआप वळतात. येथे हजारो पर्यटक धबधब्याखाली भिजण्याचा आणि नैसर्गिक सौंदर्याचा आनंद लुटतात. मात्र, महामार्गावरून धबधब्याकडे पाऊल टाकताच खड्ड्यांचा सामना करावा लागतो. काही अंतरावर गेल्यावर जुनी पाखाडी लागते, जिचे पेव्हर ब्लॉकही निघून गेले असून वाटेत सर्वत्र झाडाझुडपांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे धबधब्यापर्यंत पोहोचणे अत्यंत कठीण झाले असून भीतीच्या छायेखाली प्रवास करावा लागतो. जुनी व नादुरुस्त झालेली पाखाडी अतिशय निसरडी झाल्यामुळे पाय घसरून अनेक पर्यटक पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
या धबधब्याचे रूपडे पालटण्यासाठी काही वर्षांपूर्वी पेढे ग्रामपंचायतीने प्रयत्न केले होते, ज्यानुसार शासनाच्या पर्यटन विभागाकडून तब्बल सत्तर लाखांचा निधीही उपलब्ध झाला होता. मात्र, प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणींमुळे हा निधी वेळीच खर्च न झाल्याने तो परत गेल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे स्थानिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दुसरीकडे, सुविधांचा अभाव असला तरी पावसाळ्यात येथे मक्याच्या कणसांची विक्री जोरात सुरू असून शेकडो मक्यांची विक्री होत असल्याने हजारो रुपयांची उलाढाल होत आहे.
सवतसडा हे उत्तम पर्यटनस्थळ असून हंगामात तिथे हजारो पर्यटक येतात याची पूर्ण जाणीव ग्रामपंचायतीला आहे. पाखाडीसह अन्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी ग्रामपंचायतीचीही इच्छा आहे, मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ते शक्य होत नसल्याची खंत पेढे ग्रामपंचायतीचे उपसरपंच तुषार गमरे यांनी व्यक्त केली आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आणि या परिसराच्या विकासाकासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी जोरदार मागणी पर्यटकांकडून आणि स्थानिकांमधून होत आहे.




























































