विज्ञान रंजन – ‘उद्याची’ ट्रेन?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

n विनायक

विज्ञानाने धारण केलेली गती थांबणं तर शक्य नाही. मात्र त्या गतीचं प्रगतीतच रूपांतर सातत्याने होईल की त्यातून काही नव्या समस्या उभ्या राहतील? असे प्रश्न पडणारच. त्यांची उत्तरंसुद्धा विज्ञानालाच शोधावी लागतील. वैज्ञानिक संशोधन अनेकदा जिज्ञासाधिष्ठत असतं. त्याचा पुढे नेमका कसा उपयोग केला जाईल, याचा विचार किंवा कल्पना करणं त्या संशोधनात गढलेल्या वैज्ञानिकांना शक्य नसतं. अणुभंजनातून ऊर्जा निर्मिती होते हा क्रांतिकारी वैज्ञानिक शोध लावणाऱया आइन्स्टाईन यांना तरी कुठे ठाऊक होतं की, पुढे त्याचा वापर राजकारण आणि युद्धकारणासाठी होऊन जपानवर विध्वंसक अणुबॉम्ब कोसळतील!

असं विपरीतही कधी घडत असलं तरी संशोधन थांबवता येत नाही. त्याला एकदा आलेली गती (मोमेन्टम) रोखता येत नाही. आणखी एक उदाहरण खनिज तेलाचं. 1859 मध्ये अमेरिकेतील पेनसिल्वेनिया राज्यात ‘एडविन डेक’ची तेल विहीर अस्तित्वात आल्यावर या तेलाची महती जगाला समजली. 1908 मध्ये ब्रिटिशांनी इराणमधले तेलसाठे शोधले. तत्पूर्वी 1846 मध्ये अझरबैझानमध्ये ‘रॉक ऑइल’चा शोध लागला होता आणि हिंदुस्थानातही आसाममधल्या दिग्बोई येथे 1889 मध्ये खनिज तेल सापडलं होतं. यातील कालानुक्रम कदाचित वेगळाही असेल, पण असं तेल सापडलं आणि नंतर काही वर्षांतच विजेच्या इंधनाचा शोध लागला नि त्यातून जगाचा व्यवहारच बदलला! खनिज तेलाच्या उपपदार्थांनीही जग व्यापलं. प्लॅस्टिकचा उदय झाला. यातल्या बऱयाच गोष्टी आता त्रासदायक, प्रदूषणकारक ठरतायत. तरीही त्यांच्या निर्मितीची स्पर्धा आणि वापर थांबण्याची चिन्हं नाहीत. कारण हा वापर सोपा आणि कष्ट वाचवणारा आहे. त्याला परिणामकारी पर्याय शोधता आले तर जग नव्या गोष्टींकडे वळेल.

अपारंपरिक ऊर्जा हा त्यातला महत्त्वाचा घटक. खनिज कोळसा, पेट्रोल-डिझेल आणि वृक्षतोडीचं संकट निर्माण करणारं लाकूड वगळता निसर्गात भरपूर ऊर्जा कुठे आहे? ती सूर्यप्रकाशात आहे, वाऱयात आहे, पाण्यात आहे आणि वायूमध्येसुद्धा आहे. त्याचं पर्यावरणस्नेही ऊर्जेत रूपांतर करून ती ऊर्जा इंधन म्हणून स्वस्त आणि क्षमतेने मस्त ठरली तर सोन्याहून पिवळे म्हणावे लागेल. त्यातलाच एक प्रयत्न हायड्रोजन इंधनाचा. पृथ्वीच्या वातावरणात अत्यल्प असलेले हायड्रोजन हे सर्वात हलकं रसायन (केमिकल) आहे. या वायूच्या पाण्यातील अटळ सहभागाचा (H2O) वापर मात्र इंधनासाठी करता येतो. कारण हायड्रोजनचे दोन आणि ऑक्सिजनचा एक अशा अणू संयुगातून पाणी तयार होतं. त्यामुळे पृथ्वीवर पाण्याचा अमाप साठा असल्याचा फायदा घेऊन हायड्रोजनची निर्मिती करता येऊ शकते. प्रोटॉन एक्स्चेंज मेम्ब्रेन आणि लिथेनियम – आयर्न फॉस्फेट प्रक्रियेतून हायड्रोजन उपलब्ध करता येतो.

हायड्रोजन वायू विषारी नाही, परंतु तीव्र ज्वलनशील आणि स्पह्टक मात्र आहे. योग्य काळजी घेऊन पाण्यातील हायड्रोजन वेगळा करून त्याचे इंधन बनवले तर त्या निर्मितीमधील एफ्लुअन्ट किंवा बाहेर पडणारे ‘प्रदूषक’ केवळ पाणीच असेल. म्हणजे प्रदूषणशून्यता!

मात्र पाण्याचे असे विघटन करायला जी ऊर्जा लागेल ती एखाद्या बॅटरीत साठवणं गरजेचं ठरेल. याच तत्त्वावर देशातील हरयाणा राज्यात जिंद ते सोनिपत मार्गावर पहिली 10 डब्यांची हायड्रोजन ट्रेन सुरू झाली आहे. बारापैकी दोन डबे इंजिन इंधनाचे आहेत. सध्या ताशी 75 किलोमीटर वेगाने धावणारी ही गाडी 110 किलोमीटर वेगानेही धावू शकेल. या ट्रेनमध्ये 682 बैठका (सीट्स) असून एकूण 3600 प्रवाशांची ने-आण ही ट्रेन करते.

यातील हायड्रोजनचा वापर आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांनुसारच होत आहे. या ट्रेनच्या 2400 किलोवॉट बॅटरीचं पुनर्भरण (रिचार्ज) करण्यासाठी सोनिपत आणि जिंद येथे प्रत्येक 3000 किलो इंधनाची व्यवस्था असेल. सुमारे 110 कोटी रुपयांचा हा प्रकल्प जगातील सर्वात जास्त डब्यांची हायड्रोजन ट्रेन चालवणारा आहे. हायड्रोजन ट्रेनला वरच्या तारांची (ओव्हरहेड वायर) गरज नाही. अशा दहा डब्यांच्या ट्रेनसाठी लागणाऱया 3200 लिटर डिझेलची बचतही होणार आहे. पहिल्या 1200 किलोमीटर अंतराच्या सराव फेऱयांनंतरच ही ट्रेन रुळावर आली आहे.

यातील बॅटरीच्या निर्मितीसाठी पारंपरिक ऊर्जा वापरली तर प्रदूषण होईल, पण सौर किंवा पवन ऊर्जा वापरली तर ती अधिक पर्यावरणस्नेही ठरेल. त्यासाठी सर्वच गोष्टीसाठीच्या मूळ ऊर्जा स्रोताचा पुनर्विचार झाला पाहिजे. ‘ग्रीन हायड्रोजन’ वापरला तर किती खर्च येतो, याचाही अंदाज घ्यावा लागेल. हे प्रयोगांतीच लक्षात येईल. ट्रेनची बॅटरी पाच ते दहा वर्षे चालणार आहे. त्यानंतर या बॅटऱयांमधील रसायनं कितपत प्रदूषण घडवतील किंवा त्यांची योग्य विल्हेवाट लावण्याचं तंत्र विकसित करता येईल का? यावरही संशोधन करावं लागेल. ते कदाचित सुरूही असेल. विज्ञानाची गतिमानता आता रोखता येणार नसली तरी ते माणसासकट सर्वच सजीवांना सुखकारक कसं ठरेल, याचा विचार करत नव्या ट्रेनचं स्वागत करू या.