विशेष – आठवणीतले सुर्वे मास्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. महेश केळुसकर

वास्तवाचं मर्मभेदी दर्शन घडविणारे, पीडित, शोषित व दलित माणूस समूहाच्या उत्थानाची, उद्धाराची युगकविता साकारणारे कवी नारायण सुर्वे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. आज 16 ऑगस्ट रोजीच्या त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या काव्याचा, आठवणींचा जागर करणारा हा लेख.

तो बेटे,
आता आदमी झाला सस्ता, बकरा म्हाग झाला…
जिंदगीमध्ये पोरा, पुरा अंधेर आला
आणि सब्दाला जागवेल, असा कोन हाये दिलवाला
सबको पैसे ने खा डाला…

अशी रोजच्या व्यवहारातील भाषेशी जुळणारी सोपी, सरळ भाषाशैली सुर्वे मास्तरांनी निर्माण केली. ही कविता श्रमिकांची सुख-दुःखं व्यक्त करते. पण या सामाजिक स्तरातील भाषेची सर्रास उचल सुर्वे करतात असं नाही. व्यवहारातील भाषेशी कवितेचं कितीही जवळचं नातं असलं तरी कवितेची भाषा संपादित असते. केवळ साहित्यजन्य भाषेची कोंडी सुर्वे यांनी आपल्या भोवतीच्या सामाजिक स्तरातील संपादित भाषेचा आधार घेऊन फोडली.

दोन दिवस वाट पाहण्यात गेले
दोन दिवस दुःखात गेले,
हिशोब करतो आहे आता
किती राहिलेत डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यात, जिंदगी बर्बाद झाली…

अशा भाकरीच्या चंद्राच्या कविता लिहिणाऱया नारायण सुर्वे यांचं जन्मशताब्दी वर्ष 15 ऑक्टोबर 2025 रोजी सुरू झालं. येत्या 15 ऑक्टोबर 2026 रोजी त्याची सांगता होईल. 16 ऑगस्ट 2010 रोजी मास्तर हे जग सोडून गेले, पण आपल्या कविता आणि आठवणी मागे ठेवून. आम्हा कवी मंडळींमध्ये ‘सुर्वे मास्तर’ म्हणून ते प्रसिद्ध होते. वैयक्तिक माझ्याशी सुर्वे मास्तर बऱयाच वेळा मालवणी बोलीमध्ये बोलायचे. रस्त्याच्या कडेला सापडलेल्या या अनाथ मुलाला ज्यांनी घरी आणलं आणि सांभाळ केला त्या गिरणी कामगार असलेल्या गंगाराम सुर्वे यांच्या घरात मालवणीच बोलली जायची. त्यामुळे नारायण सुर्वे स्वतला मालवणी माणूस म्हणवून घ्यायचे. त्यांच्याबरोबर अनेक ठिकाणी मी फिरलो आणि काव्यवाचनही केलं.
परभणीला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्यावेळी सुर्वे मास्तरांची निवड झाली, त्यावेळी महाराष्ट्रात शंभरहून अधिक ठिकाणी त्यांचे सत्कार झाले आणि त्यांना शाली मिळाल्या. त्यातली फक्त एक शाल त्यांनी स्वतसाठी ठेवली.

सन 1962 मध्ये ‘ऐसा गा मी ब्रह्म’ हा सुर्वे यांचा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. वास्तवाचं एवढं मर्मभेदी दर्शन मराठी माणसाला यापूर्वी कधी घडलं नव्हतं. कवी म्हणून महाराष्ट्राला नारायण सुर्वे यांचा परिचय होण्यापूर्वी त्यांच्या अनेक कविता आणि लोकगीतं शाहीर अमरशेख यांच्या तळपत्या वाणीतून शेतकरी, कष्टकरी आणि कामगार वर्गाच्या चुलीपर्यंत जाऊन पोहोचली होती. ‘माझे विद्यापीठ’ या त्यांच्या काव्यसंग्रहामुळे एका वेगळ्याच विश्वाचा परिचय मराठी साहित्याला झाला. सुर्वे यांची स्वतची जडणघडण कशी होत गेली आणि कडवट अनुभवांचं हलाहल पचवून त्यांनी आपली वाटचाल कशी केली याचाच तो आलेख आहे. ‘जाहीरनामा’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाल्यावर, वर्तमानकालीन क्रांतिगर्भ युगाच्या उदयाची घोषणाच सुर्वे यांनी केली आहे, असा समीक्षकांनी त्यांचा गौरव केला. सूर्ययुगाची सुरुवात करणारी त्यांची कविता विश्वमानवाच्या जाणिवेनं थरथरणारी आणि मृत्युंजय क्रांतिगामी चैतन्यानं ओथंबणारी अशी अम्लान कविता आहे. ती पीडित, शोषित व दलित माणूस समूहाच्या उत्थानाची, उद्धाराची युगकविता आहे आणि म्हणूनच सुर्वे यांची कविता ही खऱया अर्थाने लोककविता आहे.

यंत्राच्या काळजातला स्वर आणि कामगाराच्या उडणाऱया नाडीचे जागते ठोके यांचे घंटारव अंतरात निनादत राहावेत, ही सुर्वे यांची आकांक्षा होती आणि या घंटानादांच्या नादवलयातून त्यांची कविता आकार घेत गेली. सुर्वे यांनी आपल्या काव्यात अनुभवाचं एक वेगळं जग निर्माण केलं आहे. कविवर्य कुसुमाग्रजांनी यालाच ‘वेगळ्या प्रांताचे नितळ दर्शन’ असं म्हटलं आहे.

नेहरू गेले तेव्हाच्या गोष्टीतली शीण पेलणाऱया जगातली सुंद्री, खोलीत उजेड घेऊन चाललेला हातगाडीवाला, पैशाचं पाकीट मारणारा पोरगा, शब्दासाठी जिणं मुश्कील आहे म्हणणारा शीगवाला, पोस्टर चिकटवणारी पोरं, इसल्या, हणम्या, लुंगीवाला, नालबंद इत्यादी व्यक्ती म्हणजे त्यांच्या वेगळ्या जगातल्या सच्चा भावविश्वाची लेणी आहेत. या वेगवेगळ्या व्यक्तींच्या भावना-व्यथा, आकांक्षा, अपेक्षा, सुख-दुःख आणि हे सर्व सोसून जगण्याची त्यांची जिद्द एक अननुभूत रूप घेऊन सुर्वेंच्या शब्दात लयीत साकार होत आणि वाचकांच्या जाणिवेच्या कक्षा वाढवत. या ठिकाणी त्यांच्या कवितेतील खरं सौंदर्य आणि सामर्थ्य जाणवतं. या जाणिवेत माणसांच्या एका नव्या जगाचं जीवन प्रतिबिंबित होताना तिच्यावरची सांप्रदायिक विचारप्रणालीची टरफलं गळून पडतात. सुर्वे मास्तरांना चंद्र फारच प्रिय असावा. त्यांच्या अनेक कवितांमधून चंद्र डोकावतो. तो कधी पिंपळावर येऊन प्रिय व्यक्तींची याद देत असतो, तर कधी सत्यं-शिवं-श्रमसौंदर्याचा चंद्र बनून तो महाराष्ट्राच्या नीलांबरी झळकताना दिसतो. कधी भाकरीचा चंद्र असतो, तर कधी गालावरचा. चंद्राबद्दल कवीला इतकी जवळीक वाटते की, त्याच्यासाठी चार हिताच्या गोष्टी कवी सांगतो. असा हा आवडणारा चंद्र या शतकात सर्वांनाच लाभला का? हा प्रश्न कवीला पडतो. तो म्हणतो – पण, ‘कुणी सांगेल काय या शतकात चंद्र महागला होता…’

सुर्वे जेव्हा लेखन करू लागले, त्या काळाचं आपण अवलोकन केलं, तर प्रकर्षानं एक गोष्ट जाणवते ती ही की, त्या काळातील मराठी कविता अतिशय आत्मनिष्ठ होती. स्वतपुरती मर्यादित होती. काहींनी कवितेत नाद उचलून धरला, तर काहींनी लय. समाजापासून स्वतला तोडून कवी स्वतच्या आवर्तात गुरफटत चालले होते, त्यावेळी सुर्वे मानवांचा समूह घेऊन पुढे आले. त्यांच्या कवितेत चळवळ आली, मिरवणुका आल्या, मोर्चे आले. या साऱया गोष्टी व्यक्तीसह त्यांच्या जीवनाचं अपरिहार्य अंग होतं म्हणून त्या गोष्टींचं त्यांच्या कवितांत येणंही अपरिहार्य होतं. ते आलं नसतं तर ती वंचना झाली असती, स्वतशी व वास्तवाशी.

रोजच्या व्यवहारातील भाषेशी जुळणारी सोपी सरळ भाषाशैली सुर्वे यांनी निर्माण केली. ही कविता श्रमिकांची सुख-दुःखं व्यक्त करते. साहित्यजन्य भाषेची कोंडी सुर्वे यांनी आपल्या भोवतीच्या सामाजिक स्तरातील संपादित भाषेचा आधार घेऊन फोडली. त्यामुळे त्यांच्या कवितेला स्वाभाविक दणकटपणा लाभला. कवी आणि वाचक यांचा दुरावा नष्ट होण्याला मदत झाली.

सुर्वे मास्तरांना जेव्हा ‘पद्मश्री’ मिळाल्याची बातमी पहिल्यांदा समजली, त्या क्षणाचे आम्ही साक्षीदार होतो. डिंपल पब्लिकेशनच्या अशोक मुळेंच्या वसई इथल्या ‘वायकीकी अपार्टमेंट’च्या पहिल्या मजल्यावरच्या फ्लॅटच्या हॉलमध्ये आम्ही बसलो होतो. वसईच्या ‘साहित्य जल्लोष’ मधील कविसंमेलन वर्तक हायस्कूलमध्ये साडेसातला सुरू होणार होतं. तत्पूर्वी चहापानासाठी मुळेंच्या घरी कविमंडळी जमली होती. त्यामध्ये नारायण सुर्वे मास्तर तर होतेच आणि त्यांच्याबरोबर आम्ही काही कवी म्हणजे केशव मेश्राम सर, रॉक कार्वालो, अशोक बागवे, परेन शिवराम जांभळे, अनंत कदम, दिवाकर गंधे असे हास्यविनोद करीत चहापान करत होतो. त्याचवेळी सुर्वेंना ही बातमी मिळाली. नंतर वर्तक हायस्कूलमध्ये कविसंमेलन सुरू झालं. प्राचार्य कोडोलीकर यांनी कविवर्य नारायण सुर्वे यांना पद्मश्री मिळाल्याची ताजी बातमी जाहीर केली आणि सभागृहातील रसिकांची गर्दी उठून उभी राहत सुर्वेंना मानवंदना देत, खूप वेळ टाळ्यांचा गजर करत राहिली. मास्तरांचा पद्मश्रीचा पहिला सत्कार तिथं वसईत झाला. उत्तरादाखल मास्तर साधेपणानं माईक समोर उभे राहिले. त्यांनी आपल्या ‘पद्मश्री’ची उद्घोषणा पहिल्यांदा वसईत होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

आमच्या आयुष्यातील हृद्ययोग असा की, सुर्वे मास्तरांचा सहवास आम्हाला खूप मिळाला आणि अनेक गावांमध्ये त्यांच्यासारख्या मोठय़ा कवीबरोबर काव्यवाचन करण्याची संधी मिळाली. मास्तरांच्या मनाचा मोठेपणा कधीच विसरता येणार नाही.

(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.) [email protected]