
अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या दणक्यानंतर मंत्रालयातील कँटीनच्या अद्ययावतीकरण करण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी राज्य शासनाने आज ३ कोटी १ लाख ७१ हजार ९९ रुपये निधी मंजूर केला. त्यासंदर्भातील शासन निर्णय आज सामान्य प्रशासन विभागाने जारी केला.
एफडीएने अलीकडेच मंत्रालयातील दोन कँटीनवर धाडी घालून तपासणी केली होती. तिथे माश्या, अस्वच्छता आढळल्याने कँटीनना नोटीसही बजावण्यात आली होती. त्यानंतर कँटीमध्ये दुरुस्ती व सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मंत्रालयाच्या मुख्य इमारतीमधील कँटीन आणि विस्तार इमारतीमधील चौरस कँटीनचे अद्ययावतीकरण केले जाणार आहे. कॅन्टीनमध्ये नवी एक्झॉस्ट प्रणाली बसवली जाणार आहे. अन्नपदार्थांवर माश्या बसू नयेत म्हणून माश्या प्रतिबंधक जाळ्या घेतल्या जाणार आहेत. स्वयंपाकगृहात मॉड्युलर उपकरणे, भांडी धुण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा बसवली जाणार आहे. इतकेच नव्हे तर कँटीनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवे गणवेशही घेतले जाणार आहेत.
नागपूर येथील शासकीय तंत्रनिकेतनमधील अधिकारी डॉ. प्रशांत विरखरे यांची मंत्रालयातील कँटीन्सच्या अद्ययावतीकरणासाठी तांत्रिक सल्लागार म्हणून शासनाने नियुक्ती केली होती. विरखरे यांनी दोन्ही कँटीनची पाहणी करून कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव केला जावा यासंदर्भात आपला अहवाल सरकारला सादर केला. दुरुस्ती डागडुजीसह विद्युतीकरण व अन्य बाबींची शिफारस त्यांनी त्यात केली आहे.
दुरुस्ती आणि पुनर्निर्माणाच्या कामासाठी मुख्य इमारतीमधील कँटीनवर ३८ लाख ४२ हजार रुपये इतका खर्च केला जाणार आहे, तर चौरस कँटीनवर २६ लाख ५३ हजार इतका खर्च होणार आहे. तसेच विद्युतीकरणाच्या कामासाठी दोन्ही कँटीनवर २ कोटी ३६ लाख ७४ हजार ९८८ रुपये इतका खर्च केला जाणार आहे.






























































