महाराष्ट्रातील दूरसंचार क्षेत्रावर जिओचे वर्चस्व, दहा वर्षांत ५.७९ कोटी ग्राहकसंख्येचा टप्पा पार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दूरसंचार सेवा देणाऱ्या अनेक ऑपरेटर कंपन्यांकडे ग्राहक पाठ फिरवत असताना रिलायन्स जिओची दमदार वाटचाल सुरू आहे. व्यापक नेटवर्क, मजबूत कव्हरेज आणि परवडणाऱ्या दरामुळे जिओने मागच्या दहा वर्षांत ५.७९ कोटी ग्राहकसंख्येचा टप्पा ओलांडला आहे. वर्षाला ४५ टक्क्यांच्या चक्रवाढ दराने झालेल्या या वाढीमुळे महाराष्ट्रातील तब्बल ४० टक्के बाजारपेठ एकट्या जिओकडे आली आहे.

जिओने सप्टेंबर २०१६ मध्ये अवघ्या १५.५ लाख ग्राहकांसह महाराष्ट्रातील दूरसंचार बाजारपेठेत प्रवेश केला. आज महाराष्ट्रात जिओचे ५.७९ कोटी ग्राहक आहेत. त्या तुलनेत अन्य सर्व कंपन्यांची मिळून ग्राहकसंख्या सुमारे ८.६७ कोटी आहे. जिओची एन्ट्री होईपर्यंत कॉलिंग आणि डेटाचा खर्च हा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होता. ४ जी तंत्रज्ञान, स्वस्त डेटा, मोफत आऊटगोईंग कॉल्सच्या माध्यमातून जिओने बाजारपेठेची सगळी गणिते बदलून टाकली. त्यामुळे ग्राहक जिओकडे आकर्षित झाले. परिणामी अवघ्या काही वर्षांत बाजारपेठेतील क्रमांक एकचा ऑपरेटर होण्यापर्यंत जिओने मजल मारली आहे.

टेक्नो क्रांतीकडे वाटचाल
जिओ लॅब्सच्या माध्यमातून स्वदेशी ६जी तंत्रज्ञानावर विकसित करण्याचे काम सुरू झाले आहे. व्यावसायिक वापरासाठी हे तंत्रज्ञान २०३० पर्यंत उपलब्ध करून देण्याचा जिओचा प्रयत्न आहे. जिओने कृषी, आरोग्य, संरक्षण, मनोरंजन क्षेत्रासाठी एआय आणि स्मार्ट तंत्रज्ञानाच्या निर्मितीकडेही लक्ष दिले आहे.

आयपीओ येतोय !
जिओने सेबीकडे आयपीओसाठी प्रस्ताव सादर केला आहे. या माध्यमातून ३७,७०० कोटींचे भांडवल उभारण्याचे जिओचे उद्दिष्ट आहे. हा देशातील सर्वात मोठा आयपीओ ठरण्याची शक्यता आहे.

देशभरात ५३.३३ कोटी ग्राहक
जिओने देशातील ग्राहकांनाही आपलेसे केले आहे. जून २०२६ पर्यंत जिओचा ग्राहकवर्ग ५३.३३ कोटींवर पोहोचला आहे. त्यातील २८.५ कोटी ग्राहक ५जी सेवेचा वापर करीत आहेत. जिओच्या नेटवर्कवरील मासिक डेटा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला असून, तो प्रति ग्राहक ४३.७ GB पर्यंत पोहोचला आहे.