
महाड एमआयडीसीतील इंडो अमाईन्स लिमिटेड या कारखान्यात विषारी गॅसची गळती होऊन एका कामगाराचा मृत्यू झाला तर एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना सायंकाळी घडली. जखमी कामगाराला मुंबई येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गॅस गळती झाली त्यावेळी कंपनीमध्ये सुमारे दहा कामगार काम करीत होते. मात्र उग्रवास येऊ लागल्याने ते कंपनीच्या बाहेर पळाले. या कामगारांनाही गॅसबाधा झाल्याने त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
इंडो अमाईन्स लिमिटेड कंपनीत शनिवारी नेहमीप्रमाणे काम सुरू होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कंपनीतील हायड्रोक्लोरिक अॅसिडमधून निघाणाऱ्या विषारी गॅसची अचानक गळती सुरू झाली. त्यावेळी कंपनीत सुमारे दहा कामगार काम करीत होते. गॅस गळतीमुळे श्वासोच्छवास घेण्यास त्रास होऊ लागला. काही कामगारांना मुदमरल्यासारखे वाटू लागले. त्यामुळे सर्वच कामगार कंपनीच्या बाहेर पळाले. मात्र अमित कुमार या कामगाराचा गॅसबाधा झाल्यामुळे मृत्यू झाला. या दुर्घटनेत आणखी एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. त्याला सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला मुंबई येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ते पुढील तपास करीत आहेत.
हायड्रोक्लोरिक अॅसिडमधून गळती झालेल्या विषारी गॅसची तीव्रता जास्त होती. त्यामुळे कंपनीतील कामगारांसह कंपनीच्या बाहेर रस्त्यावरून जात असलेल्या नागरिकांनाही या गॅस गळतीमुळे त्रास झाला.
या दुर्घटनेत गॅसबाधा झालेल्या कामगारांना महाड येथील खासगी रुगणालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
महाड एमआयडीसीतील अनेक कारखान्यांमध्ये यापूर्वी गॅस गळतीचे प्रकार घडले आहेत. आता पुन्हा गॅस गळतीचा प्रकार इंडो अमाईन्स कारखान्यात घडल्याने कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


























































