गर्भवती महिलेचा पुराच्या पाण्यातून स्ट्रेचरवर प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तेलंगणात आलेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्याला आलेल्या पुरामुळे रस्ते बंद झाल्यानंतर सात महिन्यांच्या गर्भवती महिलेला स्ट्रेचरवरून पुराच्या पाण्यातून नेण्याची वेळ गावकऱ्यांवर आली. तेलंगणातील कुमुराम भीम आसिफाबाद जिल्ह्यातील केरामेरी मंडलातील कोलम गुडा या आदिवासी वस्तीत ही घटना घडली.

कोलम गुडा परिसरातील कोडापा रामेश्वरी या सात महिन्यांच्या गर्भवती महिलेला वैद्यकीय उपचारांची गरज भासली. मात्र, रस्ता पाण्याखाली गेल्याने रुग्णवाहिका किंवा अन्य वाहन गावापर्यंत पोहोचू शकत नव्हते.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी पारंपरिक ‘डोली’ म्हणजेच तात्पुरत्या स्ट्रेचरची व्यवस्था केली. रामेश्वरी यांना त्यावर झोपवून अनेक गावकऱ्यांनी मिळून पुराच्या पाण्यातून त्यांना सुरक्षितपणे बाहेर नेण्यात आले. रस्ते आणि पुलांच्या अभावाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर या घटनेमुळे दुर्गम आदिवासी भागातील आरोग्य सुविधांपर्यंत पोहोचण्याच्या अडचणी पुन्हा अधोरेखित झाल्या आहेत.