बिहारमधील लखीसराय मंदिरात चेंगराचेंगरी; 7 भाविकांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारमधील लखीसराय जिल्ह्यातील प्रसिद्ध अशोक धाम मंदिरात सोमवारी सकाळी झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत सात भाविकांचा मृत्यू झाला असून डझनहून अधिक जण जखमी झाले आहेत. विजेची तार तुटून पडल्याची अफवा पसरल्यानंतर भाविकांमध्ये घबराट पसरली आणि ही दुर्घटना घडली.

पवित्र श्रावण महिन्यातील सोमवारी अशोक धाम शिवमंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळी पावणेसातच्या (६:४५) सुमारास विजेची तार पडल्याची अफवा पसरली व भाविकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लोकांनी पळ काढल्याने तिथे चेंगराचेंगरी झाली. यात चार महिलांसह सात जणांचा मृत्यू झाला. मृतांपैकी हेमलता देवी, ललिता देवी, रिंकू देवी आणि मनमाला देवी अशा चार महिलांची ओळख पटली असून, उर्वरित तीन जणांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या १० ते १५ जणांना तातडीने लखीसराय येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लखीसरायचे जिल्हाधिकारी शैलेंद्र कुमार यांनी सांगितले की, श्रावण सोमवारच्या पार्श्वभूमीवर मंदिरात गर्दीचे नियोजन करण्यात आले होते, मात्र अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने अधिक गर्दी झाली. भाविकांच्या प्रचंड दबावामुळे मंदिरातील बॅरिकेड्सचा एक भाग तुटला आणि लोक एकमेकांवर पडले. घटनेची माहिती मिळताच जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.