महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था ढासळली; नालासोपाऱ्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, दोन्ही आरोपी अल्पवयीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

न्स्टाग्रामवरील मैत्रीचा गैरफायदा घेत 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर दोन अल्पवयीन मुलांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नालासोपाऱ्यात घडली आहे. या अत्याचाराचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल केला. या प्रकरणी तुळींज पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले असून नालासोपाऱ्यात संताप व्यक्त होत आहे.

नालासोपारा पूर्व येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एका 17 वर्षीय मुलाबरोबर ओळख झाली होती. त्याने 11 जुलै रोजी दुपारी महत्त्वाचे काम असल्याचे सांगून मुलीला भेटायला बोलावले. ती मुलगी येताच मुलाने तिला त्याच परिसरातील एका चाळीतील खोलीमध्ये नेले. तेथे आधीच 17 वर्षांचा दुसरा एक मुलगा आला होता. या दोघांनीही मुलीला धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. दोन्ही अल्पवयीन आरोपींनी या अत्याचाराचा व्हिडीओ काढून तो व्हायरल केला. एवढेच नव्हे तर याबाबत कोणाला काही सांगितले तर तुझ्या भावाला ठार मारू अशी धमकीदेखील दिली असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या धमकीनंतर पीडित मुलगी काही काळ गप्प राहिली. पण 15 ऑगस्ट रोजी तिच्या मामाच्या मोबाईलवर अत्याचाराचा व्हिडीओ दिसताच त्याच्या पायाखालची वाळूच घसरली. मामाने तातडीने मुलीच्या घरी जाऊन तिची विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अमर मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

मामाने गाठले पोलीस ठाणे

पीडित मुलीच्या मामाने हा संपूर्ण प्रकार उघडकीस येताच तातडीने तुळींज पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास करून अत्याचार करणाऱ्या दोन्ही मुलांना ताब्यात घेतले आहे.