
मुंबईचे आद्य शिल्पकार, हिंदुस्थानच्या रेल्वेचे जनक, थोर समाजसुधारक आणि ठाणे जिल्ह्याचे सुपुत्र नामदार नाना शंकरशेट यांचे नाव ठाण्यातील प्रसिद्ध मध्यवर्ती नितीन उड्डाणपुलावर दिमाखात झळकणार आहे. नाना शंकरशेट यांचे नाव या उड्डाणपुलाला देण्याचा ठराव आज ठाणे महापालिकेच्या महासभेत बहुमताने मंजूर झाला. ठाणे महापालिकेने नानांच्या उत्तुंग कार्याचा सन्मान करून त्यांच्या स्मृती चिरंतन केल्याने नानाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
नितीन कंपनीजवळ असलेल्या शहरातील मध्यवर्ती उड्डाणपुलाला नाना शंकरशेट यांचे नाव द्यावे, यासाठी ज्येष्ठ पत्रकार व ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे हे गेल्या दोन वर्षांपासून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत होते. ठाणे महापालिकेने नितीन उड्डाणपुलाला नाना शंकरशेट यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करावा, अशी मागणी पितळे यांनी लावून धरली होती. आज अखेर त्यास यश आले असून या पुलाला नानांचे नाव देण्याचा ठराव एकमुखाने ठाणे महापालिकेच्या महासभेत मंजूर करण्यात आला.
मुरबाडचे सुपुत्र
मुंबईच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारे थोर समाजसेवक नाना शंकरशेट हे ठाणे जिल्ह्याचे सुपुत्र होते. त्यांचा जन्म मुरबाड येथे झाला. ठाण्याच्या घोडबंदर गावातदेखील त्यांचे काही काळ वास्तव्य होते. ठाणे शहराशी असलेला त्यांचा अतूट संबंध व विविध क्षेत्रांत केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून नानांचे नाव नितीन उड्डाणपुलाला देण्यात यावे, असा आग्रह ज्येष्ठ पत्रकार संजय पितळे यांनी प्रशासनाकडे धरला होता. त्यामुळे आता नितीन कंपनीचा भव्य उड्डाणपूल यापुढे नामदार नाना जगन्नाथ शंकरशेट उड्डाणपूल या नावाने ओळखला जाणार आहे.
प्रयत्नांना यश…
नाना शंकरशेट यांचे मुंबईच्या विकासातील असलेले योगदान व ठाण्याशी असलेले नाते लक्षात घेऊनच मी त्यांचे नाव नितीन उड्डाणपुलाला देण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला. महापालिका तसेच राज्य सरकारकडे पत्रव्यवहारदेखील करण्यात आला. या प्रयत्नांना यश आल्याचे मोठे समाधान असून ठाण्यातील भावी पिढीला नानांचे स्मरण राहील, अशी प्रतिक्रिया पत्रकार संजय पितळे यांनी व्यक्त केली.


























































