
नवी मुंबईत अतिरेकी घुसले असल्याची माहिती मिळताच पोलिसांच्या गाड्यांचा मोठा ताफा वाशी टोलनाक्याच्या दिशेने सायरन वाजत निघाला. गाड्यांमधून उतरलेल्या ब्लॅक कॅट पोलीस कमांडोंनी चालत्या गाड्यांतून उडी मारून गोळीबार करण्यासाठी पोझिशन घेतली. त्यामुळे या भागातील सर्वसामान्य नागरिकांची एकच पळापळ उडाली. मात्र नंतर हे मॉकड्रिल असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर ती कशी हाताळायची याची रंगीत तालीम नवी मुंबई पोलिसांनी आज केली.
नवी मुंबई शहर हे खाडीच्या किनारी आहे. त्यामुळे या शहराला दहशतवादी हल्ल्याचा धोका आहे. जर दहशतवादी हल्ला झाला तर त्याचा प्रतिकार कसा करायचा यासाठी आज हे मॉक ड्रिल घेण्यात आले. नवी मुंबईतील वाशी टोलनाका येथे अतिरेकी आले असल्याची माहिती पसरवण्यात आली. त्यानंतर पोलिसांचे विशेष पथक, स्थानिक वाशी पोलीस घटनास्थळी विजेच्या वेगाने दाखल झाले. हातात अत्याधुनिक शस्त्र घेतलेले कमांडो पाहिल्यानंतर या भागातील नागरिकांचा एकच गोंधळ उडाला. शहरात अतिरेकी घुसले असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र ही पोलिसांची रंगीत तालीम असल्याचे समजल्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला.
-
अशा प्रकारच्या अचानक मॉक ड्रिलमुळे पोलिसांची आपत्कालीन परिस्थितीतील तयारी आणि प्रतिसाद क्षमता तपासण्यास मदत होते. भविष्यात कोणताही दहशतवादी हल्ला किंवा गंभीर घटना घडल्यास कमीत कमी वेळेत प्रभावी कारवाई करता यावी हा या सरावामागचा मुख्य उद्देश होता, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.





























































