
विकासाच्या नावाखाली पुणे शहर आणि परिसरातील टेकड्या फोडणे, नैसर्गिक भूभागात हस्तक्षेप करणे आणि अनियंत्रित बांधकामे करणे थांबले पाहिजे. विकासाला आमचा विरोध नाही; मात्र पर्यावरणाची किंमत मोजून विकास नको. टेकड्या फोडण्याचे पाप थांबवा, अन्यथा राजकीय पक्ष म्हणून नव्हे, तर पुणेकर म्हणून रस्त्यावर उतरून विरोध करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी दिला.
सुळे यांनी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांची भेट घेऊन शहरातील खड्डे, कचरा, फुरसुंगी कचरा डेपो, समाविष्ट गावांमधील मिळकतकर, उंड्रीतील प्रदूषण, बावधनमधील केतकी ओढा आणि वाहतूककोंडीच्या प्रश्नांवर चर्चा केली, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
उंड्रीतील टेकड्यांच्या विद्रूपीकरणाबाबत सुळे म्हणाल्या, नैसर्गिक वातावरण पाहून नागरिकांनी तिथे घरे घेतली. मात्र आता त्याच टेकड्या फोडल्या जात आहेत. हे थांबले पाहिजे. बालभारती-पौड रस्त्यालाही आपला विरोध असल्याचे सांगत विकास आणि पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. बावधनमधील केतकी ओढ्यावर रस्ता बांधल्यामुळे पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केला. शहरातील अनेक ओढे-नाल्यांवर बांधकामे झाली असून, नाले बंद झाले आहेत. पदपथांवरील अतिक्रमांचाही प्रश्न गंभीर असल्याचे त्या म्हणाल्या. समाविष्ट गावांना मूलभूत सुविधा दिल्याशिवाय मिळकतकर आकारू नये. राज्यात वीज अतिरिक्त असल्याचा दावा केला जात असताना धायरीतील डीएसके विश्व परिसरात अनेक तास वीज का जाते, असा सवाल त्यांनी केला. वारजेतील केवळ ५०० मीटरच्या रस्त्याचे काम रखडल्याने किलोमीटरच्या रांगा लागत आहेत. महापालिका आणि राज्यात एकच सरकार असताना पुण्यातील कामे का होत नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.





























































