
बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांसह स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी लवकरच इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यात येणार आहेत. शिवसेनेने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हे यश मिळाले आहे.
गेल्या २५ ते ३० वर्षांपासून राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते ऐतिहासिक कान्हेरी गुंफेपर्यंत बेस्टची (BEST) बससेवा सुरू होती; मात्र त्या बसेस डिझेल, पेट्रोल आणि सीएनजीवर चालणाऱ्या असल्याने प्रदूषणाच्या कारणास्तव ही सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. ही बाब लक्षात येताच शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक १२ च्या माजी नगरसेविका सारिका झोरे, स्थानिक नगरसेवक धर्मेंद्र काळे, विधानसभा निरीक्षक व मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य शशिकांत झोरे यांनी शिवसेना नेते, आमदार सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद करण्याऐवजी पर्यावरणपूरक वाहतूक सुरू ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. अखेर शिवसेनेच्या निवेदनाची दखल घेत नाईक यांनी मुख्य वनसंरक्षक अनिता पाटील तसेच उपसंचालक किरण पाटील यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यामुळे लवकरच उद्यानात ई-बस सेवा पूर्ववत सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.



























































