कामोठ्यात शौचालयात ‘लॉजिंग’; सोफा, वॉशिंग मशीन, किचन पाहून नागरिकही अवाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पनवेल महापालिकेच्या कामोठे येथील एका सार्वजनिक शौचालयात चक्क ‘लॉजिंग’ सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. शौचालयाच्या इमारतीत सोफा, वॉशिंग मशीन, किचनसह इतर सुविधा पाहून नागरिकही चक्रावले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पोलखोल केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणीदेखील शिवसेनेने केली आहे.

कामोठेतील सेक्टर १५ मध्ये पालिकेने लाखो रुपये खर्च करून हे शौचालय बांधले असून चार ते पाच महिन्यांपूर्वीच उद्घाटन झाले आहे. मात्र नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी बांधलेल्या या शौचालयाता चक्क लॉजिंग सुरू असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सुनील गोवारी यांनी केला आहे. याबाबत त्यांनी व्हिडीओ शूट करून पोलखोल केली आहे. या धक्कादायक प्रकाराबाबत गोवारी यांनी महापौरांकडे तक्रार केली असून कारवाईची मागणी केली आहे. शौचालयाच्या ठिकाणी सोफा, वॉशिंग मशीन आणि किचनसारख्या सुविधा कशासाठी उभारण्यात आल्या, या कामासाठी कोणत्या निधीतून किती खर्च झाला, कामाचे अंदाजपत्रक काय होते, प्रत्यक्षात मंजूर आराखड्यानुसारच बांधकाम झाले का, याची पालिकेने तातडीने चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी केली आहे.