
शहरीकरण आणि वाढत्या वाहनसंख्येमुळे वाहतूक कोंडी ही आजच्या काळात देशातील एक अत्यंत गंभीर व मोठी समस्या बनली आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रवासातच वेळ वाया जातो. त्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. असेच काहीसे हाल सध्या बंगळुरूतील कर्मचाऱ्यांचे होत असून तेथील भीषण वाहतूक कोंडीमुळे कर्मचाऱ्यांची प्रचंड शारीरिक आणि मानसिक कुचंबणा होत आहे. याचा थेट परिणाम त्यांच्या कामावर होताना दिसत आहे.
बंगळुरूतील ‘अपलाईड एआय स्टुडिओ’ (Applied AI Studio) चे संस्थापक बाला पन्नीरसेल्वम यांनी आपल्या कार्यालयातील एक फोटो लिंक्डइनवर शेअर केला आहे. सकाळी सव्वा दहा वाजता, जेव्हा कार्यालयांमध्ये कर्मचारी येऊन कामाची सुरूवात होणे अपेक्षित असते, तेव्हा त्यांच्या कार्यालयातील बरीचसे डेस्क रिकामी असल्याचे या फोटोमध्ये दिसत आहे. ही समस्या लोकांची नाही तर, कार्यालयात पोहोचण्यासाठी जो संघर्ष करावा लागतो त्याची आहे,” अशी खंत बाला पन्नीरसेल्वम यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केली आहे.
बंगळुरूच्या रस्त्यांवर रोजचा प्रवास करताना किती वेळ जातो, याचे वास्तव त्यांनी मांडले आहे. एचएसआर (HSR) परिसरातील 4 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी स्कूटरवरून 20 मिनिटे आणि कारने 30 मिनिटे लागतात, तर गर्दीच्या वेळी यात आणखी भर पडते. सिग्नल न पाळणाऱ्या दुचाकीस्वारांना चुकवत आणि ट्रॅफिकशी झुंजत कर्मचारी जेव्हा कार्यालयात पोहोचतात, तेव्हा ते पूर्णपणे थकलेले असतात, असे त्यांनी सांगितले.
संध्याकाळच्या प्रवासाची स्थिती याहून बिकट असल्याचे त्यांनी नमूद केले. संध्याकाळी 6 नंतर निघाल्यास नेहमीपेक्षा दुप्पट वेळ लागतो तर, 5 वाजता सुटणारे कर्मचारीसुद्धा घरी पोहोचताना इतके थकलेले असतात की त्यांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. या थकव्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा उशिरा पोहोचण्याचे चक्र सुरूच राहते. त्यांनी स्वतःचा अनुभव सांगताना म्हटले की, पाऊस किंवा इतर कोणतीही अडचण नसताना दुपारी 4 वाजता व्हाईटफिल्ड ते एचएसआर हे 17 किलोमीटर अंतर कापण्यासाठी त्यांना तब्बल दोन तास लागले होते.
या शहरात चांगल्या प्रकारे काम करण्याची आपली क्षमता संपत चालली आहे” असे म्हणत त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सततच्या या गोंधळामुळे कर्मचाऱ्यांना विचार करण्यासाठी मानसिक मोकळीक कशी मिळणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. बंगळुरूमधील अनेक रहिवाशांनी त्यांच्या या पोस्टवर सहमती दर्शवली असून अनेकांनी रोजच्या प्रवासातील आपले भयानक अनुभव कमेंट्समध्ये शेअर केले आहेत.



























































