रायगडातील बळीराजा होणार टेक्नोसेव्ही; आता अॅपवरून खत खरेदी खताची उपलब्धता मुबलक, वितरणप्रक्रिया पारदर्शक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे रायगड जिल्ह्यातील शेतकरी आता टेक्नोसेव्ही झाले आहेत. रासायनिक खतांची उपलब्धता, ऑनलाइन बुकिंग आणि वितरणप्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि शेतकरीहिताची करण्यासाठी कृषी विभागाकडून फार्म वर्क फॉर फर्टिलायझर सेल ही ऑनलाइन खत विक्रीप्रणाली सुरू केली आहे.

खतांचा साठा उपलब्ध आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी शेतकऱ्यांना यापूर्वी विविध कृषी केंद्रांवर वारंवार जावे लागत होते. त्यामुळे त्यांचा वेळ आणि खर्च वाया जात होता. नवीन प्रणालीमुळे शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवरूनच आवश्यक खतांची उपलब्धता तपासून जवळच्या कृषी केंद्रातील विक्रेत्याकडे खताचे बुकिंग करता येणार आहे. यामध्ये युरिया, डीएपी, सुफला तसेच इतर अनुदानित खतांचा समावेश आहे.

शेतकऱ्यांनी मोबाईलवर फार्म वर्क फॉर फर्टिलायझर सेल हे अॅप्लिकेशन डाउनलोड करावे. स्मार्टफोनची सुविधा नसलेल्या शेतकऱ्यांना जवळच्या अधिकृत खत विक्रेत्याकडे बुकिंग करता येणार आहे. बुकिंगसाठी शेतकरी आयडी, आधार क्रमांक तसेच जमीन व पिकांची आवश्यक माहिती उपलब्ध असणे गरजेचे आहे.

बुकिंगनंतर मिळालेला क्यूआर कोड अथवा टोकन को दिवसांसाठी वैध राहणार खताची खरेदी न झाल्यास पुन्हा बुकिंग करता येणार आहे. शेतकऱ्याला स्वतः खत घेण्यासाठी उपस्थित राहता येत नसल्यास त्याच्या वतीने अधिकृत प्रतिनिधीलाही खत घेता येणार आहे.

जिल्ह्यात खतांची उपलब्धता कायम राहावी आणि कोणत्याही भागात खताची कमतरता भासू नये यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. नवीन प्रणाली प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हास्तरीय व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी तसेच खत विक्रेत्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे.