अमेरिकेचे कर्ज ४० ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचले; रॉबर्ट कियोसाकी यांचे भाकीत ठरले खरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेचे राष्ट्रीय कर्ज इतिहासात प्रथमच ४० ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेले आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अमेरिकेचे कर्ज दर पाच महिन्यांत अंदाजे १ ट्रिलियन डॉलर्सने वाढले आहे. ‘रिच डॅड, पुअर डॅड’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये, जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेतील वाढत्या कर्जाबद्दल भाकीत केले होते.ते आठवड्याभरातच खरे ठरल्याचे दिसत आहे.

गेल्या आठवड्यात, रॉबर्ट कियोसाकी यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये भाकीत केले होते की, अमेरिकेचे राष्ट्रीय कर्ज लवकरच ४० ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंटच्या आकडेवारीनुसार, हे भाकीत खरे ठरत असल्याचे दिसते.

डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांच्या कार्यकाळात अमेरिकेचे कर्ज जवळपास दुप्पट झाले आहे. रॉयटर्सच्या एका अहवालानुसार, अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंटची नवीन आकडेवारी धक्कादायक आहे. त्यानुसार आता अमेरिकेतील एकूण सार्वजनिक कर्ज ४०.०४७ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले आहे. यामध्ये जनतेकडे असलेल्या ३२.२६६ ट्रिलियन डॉलर्सच्या सरकारी सिक्युरिटीज आणि ७.७८२ ट्रिलियन डॉलर्सच्या आंतर-सरकारी कर्जाचा समावेश आहे.

अमेरिकन सरकारच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेचे राष्ट्रीय कर्ज अवघ्या १० महिन्यांत २ ट्रिलियन डॉलर्सने वाढले आहे. गेल्या काही महिन्यांत ते वेगाने वाढले असून, ऑक्टोबर २०२५ मध्ये ३८ ट्रिलियन डॉलर्स आणि त्यानंतर सुमारे पाच महिन्यांनी मार्च २०२६ मध्ये ३९ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले आहे. १८ ऑगस्टपर्यंत ते ४० ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेले होते.

गेल्या आठवड्यात एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रॉबर्ट कियोसाकी यांनी अमेरिकेच्या कर्जासंदर्भात केलेल्या एका पोस्टवर भाष्य करताना, त्यांनी चिंता व्यक्त केली आणि लिहिले, लवकरच अमेरिकेचे राष्ट्रीय कर्ज ४० ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल! अमेरिकेच्या वाढत्या कर्जाच्या ओझ्याबद्दल चिंता व्यक्त करताना, कियोसाकी यांनी लोकांना योग्य गुंतवणुकीचे पर्याय निवडण्याचा सल्लाही दिला. ज्यात त्यांनी सोने आणि चांदीला महत्त्वाचे स्थान दिले आहे.