गरम समोसे मागितल्याने वाराणसीत दुकानदाराकडून ग्राहकाला मारहाण; पाच जणांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गरम समोसे मागितल्याच्या कारणातून दुकानदाराने ग्राहकाला मारहाण केल्याची घटना उत्तर प्रदेशातील वाराणसीत घडली. याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाराणसीतील जलुपुरा मार्केटमध्ये ही घटना घडली. तक्रारदाराने न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यानंतर पाच महिन्यांनी, न्यायालयाच्या आदेशानुसार चौबेपूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, तक्रारदार शिव शंकर सिंह हे फेब्रुवारीमध्ये कामासाठी चंदौलीला गेले होते. तेथून परतताना ते जलुपुरा मार्केटमधील गुप्तेश्वर सिंह यांच्या नाश्त्याच्या दुकानाशी थांबले. या दुकानातून त्यांनी दोन समोसे आणि बर्फी घेतली. समोसे थंड असल्याने शिव शंकर सिंह यांनी दुकानदाराला समोसे गरम करून देण्यास सांगितले. यावरून ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाले.

ग्राहक सिंह यांनी दुकानमालकाला बोलावण्यास सांगितले. दुकानदार आल्यानंतर पुन्हा गरम समोसे देण्यावरून वाद झाला. यानंतर दुकानदार आणि त्याच्यासोबत असलेल्या इतरांनी मारहाण केल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे. यानंतर सिंह यांनी स्थानिक पोलीस आणि पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाशी संपर्क साधला. परंतु त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही; त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली.

अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार पाच महिन्यांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी बीएनएस (BNS) च्या कलम 19(2), 115(2), 352, ३५ आणि इतर कलमांतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.