
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरातील वन टाऊन परिसरात गुरुवारी एका सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. शिक्षिकेने वर्गात मुलाच्या कानशिलात मारली, ज्यामुळे भीतीने मुलाचा मृत्यू झाला, असा आरोप आहे. लिटल गार्डन्स स्कूलमध्ये यूकेजी वर्गात शिकणाऱ्या प्रणय तेजा याला किंग जॉर्ज रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. मारहाणीमुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत मुलाच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर निदर्शने केली.
इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, वर्गातील सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. फुटेजमध्ये शिक्षिका मुलाच्या कानशिलात मारताना दिसत आहे. कानशिलात मारल्यानंतर मुलगा क्षणभर स्तब्ध उभा राहतो आणि मग कोसळतो. मुलाच्या मृत्यूबाबात पोलीस तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मुलाच्या मृत्यूचे रहस्य उलगडेल.
कुटुंबाने मुलाच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान मुलाला कोणतीही वैद्यकीय समस्या नसल्याचा दावा त्याच्या वडिलांनी केला आहे. शिक्षिकेने मारल्यानंतर मुलगा घाबरला आणि खाली कोसळला. कुटुंबीयांना माहिती मिळताच त्यांनी शाळेत धाव घेत मुलाला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.



























































