
गावागावांमधील सरकारी शाळांची स्थिती सुधारण्यासाठी ‘सीजेपी’चे संस्थापक अभिजित दीपके यांनी स्वातंत्र्य दिनापासून ‘शाळा ठीक करा’ या नवीन देशव्यापी अभियानाला सुरुवात केली आहे. याच अभियानाचा भाग म्हणून राजस्थानमधील कानवपुरा (रामपुरा) येथे एका सरकारी शाळेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या सीजेपीच्या पथकावर जीवघेणा हल्ला झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. हा हल्ला भाजप कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप अभिजित दीपके यांनी केला असून राजस्थान पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका आणि त्यांचे सहकारी शुक्रवारी रामपुरा परिसरातील एका सरकारी शाळेची पाहणी करण्यासाठी गेले होते. ही शाळा गेल्या अनेक वर्षांपासून एका म्हशीच्या गोठ्यात भरवली जात असल्याचा दावा सीजेपीने केला. शाळेतील पायाभूत सुविधांचा अभाव आणि दुरावस्था उघड करण्यासाठी सीजेपीच्या पथकाने ऑडिट अभियान चालवले होते. या पाहणीदरम्यान काही लोकांनी पथकावर अचानक हल्ला केला, कार्यकर्त्यांना मारहाण केली आणि त्यांच्या गाडीची काचही फोडली. याचा व्हिडीओही समोर आला आहे.
अभिजित दीपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत तीव्र संताप व्यक्त केला. राजस्थानमध्ये नेमके काय चालले आहे? भाजपच्या गुंडांनी सीजेपीच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य केले. तसेच, घटना घडत असताना राजस्थान पोलीस केवळ मूक प्रेक्षक बनून पाहत होते, असा दावाही दीपके यांनी केला.
What the F is happening in Rajasthan?????
Goons of BJP are after the blood of Ashutosh and other CJP volunteers.
How can @PoliceRajasthan allow this kind of attack? pic.twitter.com/F3kdPwS4kD
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) August 21, 2026
हल्ला करणारे स्थानिक गावकरी नव्हते, तर भाजपने बाहेरून आणलेले गुंड होते, असा आरोप आशुतोष रांका यांनी केला आहे. एका बाजूला लहान मुले म्हशीच्या गोठ्यात शिकत आहेत आणि दुसरीकडे शाळेची पाहणी करणाऱ्यांवर हल्ले केले जात आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.



























































