
>> डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी
ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्कर यांचे नुकतेच निधन झाले. अत्यंत प्रगल्भ आशयाच्या त्यांच्या काव्यनिर्मितीने साहित्यजगताला समृद्ध केले. निर्लेप जीवनजाणीव असणाऱया अशा कवीचे जाणे रसिकांना व्याकुळ करणारे आहे.
‘झा डांचे प्रश्न झाडांना आणि पाखरांचे पाखरांना विचारावेत’ याचे स्वच्छ भान असलेला, ‘बऱयाच दिवसांत कविता लिहिली नाही, म्हणजे बऱयाच दिवसांत स्वतला भेटलो नाही’ म्हणणारा…
कालचे सर्व गंगेचे, गंगेत सोडुनी दिधले,
पात्रात निरामय नूतन, दे भोग आजचे सगळे…
इतकी स्वच्छ जीवनजाणीव असणारा कवी परवापरवापर्यंत आपल्यात होता. कविवर्य दत्तात्रेय भास्कर धामणस्कर. जन्म 30 ऑक्टोबर 1930 – मृत्यू 14 ऑगस्ट 2026. पंचाण्णव वर्षांचं सुदीर्घ आयुष्य त्यांना लाभलं. या संपूर्ण काळात स्वतच्या गतीनं, स्वतच्या पिंडाशी प्रामाणिक राहात संथ सातत्याने ते कविता आणि कविताच लिहित राहिले. ‘आपली कविता हे आपलं सत्त्व आहे’ या भावनेनं तिला जपतही राहिले. त्यांनी आपली कविता ना कधी ‘सादर’ केली, ना कधी कुठे मिरवली. ती आपली शांतपणे आपल्या तेजाने तेवत राहिली. म्हणूनच तिच्याजवळ आलेल्या रसिकाला तिने एक शांतवन दिले.
राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांत एम.ए. झाल्यावर रिझर्व बँक ऑफ इंडियामध्ये त्यांनी नोकरी केली. डोंबिवलीसारख्या सांस्कृतिक शहरात सुशांत वसाहतीत झाडांच्या संगतीनं टुमदार बंगली उभारून त्यात लौकिक संसार मोठय़ा समाधानानं केला. आपला शेवटचा कवितासंग्रह त्यांनी आपल्या सूनबाईंना अर्पण केलाय, हेच किती समाधानी, बोलकं चित्र आहे! तसं तर ते वयाच्या 17-18 व्या वर्षीच कविता लिहू लागले, पण त्या प्रसिद्ध मात्र खूप उशिरा म्हणजे 70 च्या दशकात केल्या त्यांनी. नियमितपणे ‘सत्यकथे’त त्यांची कविता आपला कोपरा उजळत होती. 1982 मध्ये त्यांचा ‘प्राक्तनाचे संदर्भ’ हा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. नंतर 2001 मध्ये ‘बरेच काही उगवून आलेले’ आणि 2016 मध्ये ‘भरून आलेले आकाश.’ भाराभर लिहिण्याचा सोस त्यांच्या लेखणीला नव्हता. मात्र जे लिहिलं ते अस्सल. झाडानं उगवून यावे, तितकं स्वाभाविक. त्यांची कविता अत्यंत प्रगल्भ आशयाची आहे. प्रगत विचारांचीदेखील. ‘विसर्जन’ ही त्यांची गाजलेली कविता. वडिलांकडून गणपतीची मूर्ती आपल्या हाती घेणाऱया मुलाची ही कविता परंपरा नव्या पिढीला ओझ्याखाली चिरडून टाकत असतात, असं सुचवते.
निसर्गाशी भावसंवाद करू शकणारा हा मनस्वी कवी. त्यांच्या अनेक कवितांत ते आपला आंतरिक अनुभव मांडतात. निसर्ग हा त्यांच्या भावविश्वाचा भाग आहे. प्राथमिक शिक्षण होईतो ते महाड तालुक्यात वाळसुरे इथे होते. तिथून ते निसर्गस्नेह भरून घेऊन आले तो मुंबईतही बहरत राहिला. त्यामुळे त्यांची कविता वाचली की आतून निभ्रांत वाटतं. कवितेतून प्रकटलेल्या त्यांच्या संवेदना निसर्गाशी किती संवादी आहेत पहा. वारा, विजन-अरण्य, नदी, पाखरं, ढग, माती, अरण्य, झाडं, पानं, कळ्या, फुलं त्या त्या निसर्ग घटकांची वैशिष्टय़ं आणि कवीला संवेदनांच्या पातळीवर त्यांच्याविषयी वाटणारं ममत्व…यांचा फार समर्पक मेळ त्यांच्या कितीतरी कवितात जमला आहे. त्यांची प्रेमकवितादेखील निसर्गसंवेदन सहजपणे घेऊन येते. आठवते ना त्यांची अनंताचे फूल ही कविता?
तुझ्या केसात अनंताचे फूल आहे
म्हणजे तुझ्या अंगणात अनंताचे झाड आहे,
या जाणिवेने मी मोहरून जातो.
नावगाव माहीत नसतानाही तुझे,
आपल्यात एक तरल संबंध
रुजून आलेला मी पाहतो…
‘कवितेची वही गच्च भरून गेलीय.. आता पाने सुटी करून मोकळी करायला हवीत…’ याही कवितेत पहा. सुरुवात किती साधी! एक विधान. पण कवी त्यामधून खूप काही सुचवतो. काळ आणि अवकाश यांच्या अक्षावर जणू तो आपली निर्मिती पाहतो. ती भरगच्च आहे, याची यथार्थ जाण त्याला आहे. पण पाहणे कसे..? तर दूरस्थ. आपल्याच निर्मितीकडे तो काहीसा अलिप्तपणे बघतो आहे. त्यात एक खोल समज आहे. निर्मळ स्वाभाविकता आहे. निर्मितीचा अनेक अंगांनी मनपूर्वक शोध घेतो आहे कवी. ही कविता भाष्य करीत नाही. म्हणून तिच्यातली तरलता कायम राहते. पाण्याबरोबर वाहणाऱया, ढगांबरोबर देशाच्या सीमा पार करणाऱया कवितांखेरीज अखेर काही कविता केवळ माझ्याजवळ उरतील! ते पुढे लिहितात, तुम्हीच झाडांचे बहर आहात असे मीच त्यांना कैकदा सांगितलेले आहे.
कवितेचा हा शेवट फार विलक्षण आहे! तो तत्त्वज्ञानात्मक तर आहेच, पण स्वतपासून दूर झाल्याशिवाय इतका व्यक्तित्त्वसंपन्न उद्गार निघणे अशक्य. त्यातही निर्मिती आणि लौकिक जीवन, सर्जन आणि मी यात अंतर आहे, याचेही भान आहे. भोवतीचं वास्तव, व्यक्ती आणि समाज यांतली परस्पर गुंतागुंतही किती सूक्ष्मपणे आलीय यात. त्यांच्या कवितेत सामाजिक तणावामुळे आलेली अस्वस्थता आहे, पण ती संवेदनशील मनाला येणाऱया व्याकुळतेमधून दिसते. अंतस्थ वेदना त्यांच्या कवितेत आहे. खोल गहिऱया जखमेप्रमाणे. तिच्यात मोठा आक्रोश नाही वा लक्षवेधी जोरकसपणा नाही. तरीही सूचक भाष्य कशी करते पहा ही कविता –
एक रहस्य सांगावे म्हणून
फुले पाकळ्या उघडतात, तेव्हा
समस्त आस्तिक तिथे पोहोचलेले असतात
फुलांच्या परडय़ा घेऊन…
ही अभिव्यक्ती अत्यंत संयमित आहे. ती सूचक आहे, गर्भित अर्थ असणारी आहे. तिच्यात चिंतन आहेच, पण चिंतनाच्या ओझ्याने ती जड झालेली नाही. ‘प्राक्तनाचे संदर्भ’सारख्या काही कविता सामाजिक विषमतेची चरचरीत जाणीव करून देतात आणि तरी त्या कवीला ‘आत्मन’ असणाऱया कोवळ्या मुलीला मुळीही धूसर करत नाही.
‘प्रिय आत्मन… इतक्या कोवळ्या वयात,
तू तुझी जागा ओळखायला नको होतीस.’
हा आत्मन शब्द पहा. त्याचा अर्थ आहे ‘ट्रु सेल्फ’! कोणतीही एक लहानशी कष्टकरी पोरगी आत्मन वाटणारे कवी-हृदय किती विशाल, किती उदार असेल.
धामणस्करांची कविता साधी आहे. शैलीचा नखरा तिला मानवत नाही. प्रतिमांचा चमचमाट तिला सोसवत नाही. पण ती असं काही जीवनसत्य सहज समजावते की, रसिक केवळ अवाक् होतो आणि त्या सत्याच्या दर्शनानं उजळून निघतो. पहा- ‘परिपक्व झाडे’ या कवितेत ते म्हणतात,
मुकी झाडे अनाग्रहीपणे
पक्ष्यांचे स्वातंत्र्य एकदम मान्य करतात;
गाणे आपल्याच कंठात उद्भवते हा गैरसमज
त्यांचा त्यांनाच उमगेपर्यंत झाडे
वाट पाहवयास तयार आहेत.
अहंकारावर किती साधे सुंदर उत्तर! मातीशी निष्ठावान राहणाऱया झाडांच्या बाजूनं कवितेची ढाल करून जणू धामणस्कर उभे आहेत. सदासर्वकाळ. सजगपणे.
(लेखिका साहित्य-समीक्षक आहेत.)




























































