बोलीभाषेची समृद्धी – प्रथा, परंपरांची वारली बोली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वर्णिका काकडे

वारली ही महाराष्ट्रातील आदिवासी जमात. या जमातीची बोलीभाषा वारली. ही हिंद-आर्य भाषा बहुतेकदा मराठी म्हणून वर्गीकृत केली जाते, परंतु कधी कधी कोकणी किंवा भिली भाषेत पण वर्गीकरण होते. या भाषेवर कोकणी, मराठी आणि गुजराती भाषेचा पगडा आहे. यामुळे यात शब्दांची सरमिसळ दिसून येते. या बोलीला लिपी नाही. वारली बोलीभाषेचे शिक्षण आणि वाचन शृंखला राबवल्या जात आहेत. ही संस्कृती आणि बोली टिकवून ठेवण्यासाठी विशेष साहित्य निर्मिती केली जात आहे. वारली समाजाची स्वतंत्र चित्र संस्कृती असल्याने यातील काही शब्द या चित्रलिपीनुसार व्यक्त होतात.

प्रामुख्याने पालघर, ठाणे, आणि लगतच्या दादरा आणि नगर हवेली भागात बोलली जाते. स्वरूपः वारली लोकआपल्या दैनंदिन जीवनात हीच बोली वापरतात. शाळेत जाणाऱया मुलांना सुरुवातीला प्रमाण मराठी समजण्यात अडचण येते. कारण त्यांची घरची भाषा वारली असते. लिपीः या बोलीभाषेची स्वतची स्वतंत्र लिपी नाही; ती प्रामुख्याने देवनागरी लिपीत किंवा तोंडी स्वरूपात वापरली जाते.

वारल्यांची वस्ती मुख्यत्वे महाराष्ट्र, व गुजरात राज्यांत तसेच दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांत असून महाराष्ट्र राज्याच्या ठाणे, पालघर व नाशिक जिह्यांत त्यांची वस्ती अधिक प्रमाणात आढळते. वारली जमातीचे विद्यार्थी शाळेत येतात. परंतु त्यांना प्रमाण मराठी समजत नाही. यात त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच त्यांना शाळेत रमवण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या बोलीभाषेत काही गोष्टी भाषांतरित केल्या आहेत.

बऱयाच बोली आज मृत्युपंथाला लागल्या आहेत. यात वारली बोलीचाही समावेश आहे. यामुळे रोजच्या वापरातही प्रमाण भाषेला प्राधान्य दिले जात आहे. तसेच पूर्वीचा वारली समाज आता आदिम अथवा शेतीला प्राधान्य देणारा राहिला नसल्याने काही प्रथा, परंपरा आपोआप नष्ट होत आहेत, ज्यायोगे त्याच्याशी निगडीत शब्दांचाही वापर होताना दिसत नाही. याचा अर्थ आपण आपल्या भाषेला नाकारण्यासारखे आहे.