फिरस्ती – पाच्छापूर किल्ला उपेक्षित पराक्रमाची गोष्ट!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रांजल वाघ

उत्तर कर्नाटकातील बेळगाव जिह्यातील हुक्केरी तालुक्यात पाच्छापूर हे गाव वसलेले आहे. पाच्छापूर म्हणजे ‘पातशहा-पूर’ याचा अपभ्रंश! महाराष्ट्रात सुधागडच्या पायथ्यालासुद्धा पाच्छापूर नावाचे गाव आहे. औरंगजेबाचा मुलगा शहजादा अकबर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना भेटला म्हणून त्याचे नाव असे पडले. तसाच काहीसा इतिहास कर्नाटकातील या गावाचा असणार.

बेळगाव, संकेश्वर आणि गोकाक या तिन्ही शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या गावात, एका 150 फूट उंच टेकडीवर पाच्छापूरचा दुर्ग उभा आहे. जरी हा किल्ला आज पर्यटनाच्या दृष्टीने दुर्लक्षित असला, तरी उत्तर कर्नाटकातील मराठा साम्राज्य आणि प्रादेशिक सत्तांच्या संघर्षात या किल्ल्याचे स्थान सैनिकीदृष्टय़ा अत्यंत मोक्याचे होते.

या किल्ल्याची मूळ निर्मिती 17 व्या शतकाच्या उत्तरार्धात सावनूरच्या नबाबांनी म्हणजेच मियाना घराण्याने केली. आपल्या राज्याच्या उत्तर सीमा सुरक्षित ठेवणे आणि गोकाककडे जाणाऱया व्यापारी मार्गांवर नजर ठेवणे हा यामागील मुख्य हेतू होता. पूर्वी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावाला वेढणारी एक दगडी तटबंदी व वेशीचा दरवाजा होता. आज तटबंदी नावाला उरली आहे, पण गावच्या मागच्या बाजूस दरवाजा आजही तग धरून उभा आहे. टेकडीच्या माथ्यावर बालेकिल्ला विस्तारलेला आहे, ज्याला सुरक्षेसाठी 7 मजबूत बुरुज उभारण्यात आले होते. पूर्व दिशेच्या मुख्य महाद्वारावर पौराणिक ‘शरभ’ आणि कमळाचे सुंदर कोरीव काम आढळते. टेकडीवर खडकात खोदलेली पाण्याची दोन मोठी टाकी आहेत. तसेच उद्ध्वस्त वाडय़ाचे अवशेष पाहायला मिळतात.

पाच्छापूर किल्ल्याचा सर्वात महत्त्वाचा ऐतिहासिक टप्पा पेशवेकालीन मराठा मोहिमेशी जोडलेला आहे. 1746 मध्ये चिमाजी अप्पा यांचे सुपुत्र सदाशिवराव भाऊ यांनी महादजी पंत पुरंदरे आणि सखाराम बापू यांच्यासमवेत कर्नाटकात मोहीम आखली.

सावनूरच्या नबाबाने मराठय़ांचे वर्चस्व नाकारल्याने, मराठा सैन्याने नबाबाच्या ताब्यातील एक-एक ठाणे जिंकण्यास सुरुवात केली. 5 डिसेंबर 1746 रोजी मराठा सैन्याने पाच्छापूर किल्ल्यावर हल्ला करून तो हस्तगत केला. या विजयानंतर नबाबाचा पूर्ण पराभव झाला आणि मराठय़ांनी पाच्छापूर, गोकाक, बदामी, नरगुंद यांसह 22 परगणे (जिल्हे) मराठा साम्राज्यात पुन्हा समाविष्ट केले.

इतका ऐतिहासिक व सैनिकी वारसा लाभलेला हा किल्ला आज अत्यंत वाईट अवस्थेत आहे. पुरातत्व खाते आणि स्थानिक प्रशासनाच्या शून्य देखभालीमुळे किल्ल्याची तटबंदी ढासळली असून संपूर्ण टेकडीवर काटेरी झुडपे वाढली आहेत.

सर्वात संतापजनक आणि वेदनादायी बाब म्हणजे, स्थानिक गावकऱयांकडून या ऐतिहासिक किल्ल्याच्या मुख्य दरवाजाचा आणि तटबंदीचा वापर सर्रास उघडय़ावर शौचास जाण्यासाठी केला जात आहे. ज्या भूमीवर मराठय़ांचे रक्त सांडले आणि इतिहास घडला, ती जागा आज घाणीचे आणि दुर्गंधीचे साम्राज्य बनली आहे!