
पेट्रोल-गॅस दरवाढीने सर्वसामान्य जनता आधीच होरपळली असताना ऐन सणासुदीच्या दिवसांत दररोजच्या जेवणात लागणारा नारळ दहा रुपयांनी महागला आहे. शिवाय साखर, गूळ, कांदे, भाज्या आणि खाद्यतेलाचे दरही 10 ते 20 रुपयांपर्यंत वाढले आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले असून रोजचा स्वयंपाक करायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आखाती युद्धाचे कारण देत सरकारने केलेल्या इंधन दरवाढीमुळे दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंच्या किमती वाढल्याने सर्वसामान्य आधीच मेटाकुटीला आले आहेत. यातच आता रोजच्या वापरातील स्वयंपाकाच्या वस्तूंच्या किमती वाढल्याने सणासुदीच्या दिवसात उसनवारीची वेळ येणार आहे. 30 रुपयांपासून 50 रुपयांपर्यंत मिळणाऱ्या नारळाच्या किमती थेट पाच रुपयांनी महागल्या आहेत. त्यामुळे आता रोजच्या भाजी, आमटीत खोबरे कमी वापरावे लागणार असल्याची खंत गृहिणींकडून व्यक्त केली जात आहे. नारळी पौर्णिमा, सणासुदीत खोबऱ्याचा वापर करून केले जाणारे गोडधोड यालाही नारळाच्या महागाईचा फटका बसणार आहे.
भाज्यांना ‘फोडणी’
गेल्या काही दिवसांत भाजी उत्पादक क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसाचा फटका विशेषतः पालेभाजीला बसला आहे. त्यामुळे वाशी मार्केटमध्ये अनेक भाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे पालेभाजी, मटर, कांदा, वाल, फरसबी, कोबी, काकडी इत्यादी भाज्यांच्या किमतीत किलोमागे पाच ते दहा रुपयांची वाढ झाली आहे.
ड्रायफ्रूट महागले
सणासुदीच्या दिवसांतील उपवास आणि प्रसादासाठी वापरल्या जाणाऱ्या ड्रायफ्रूटच्या किमती 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. आखाती युद्धामुळे आवक घटल्याने ही दरवाढ झाल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.
अशा वाढल्या किमती
वस्तू आधी आता
नारळ 40 50
गूळ 76 84
कांदे 30 45
तेल 170 180
साखर 62 74
तीळ 319 360

























































