रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही, आठ लाखांची भरपाई देण्याचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांना भरपाई नाकारणाऱया रेल्वे प्रशासनाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दणका दिला आहे. रेल्वे पकडताना झालेल्या अपघातात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास केवळ प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याच्या कारणावरून भरपाई नाकारता येणार नाही असे स्पष्ट करत हायकोर्टाने यवतमाळ जिल्हय़ातील मृत तरुणाच्या आईला 8 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला दिले.

मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर अंकुश निमकर यांचा 14 मे 2023 रोजी रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन मृत्यू झाला. या घटनेनंतर त्यांच्या आईने भरपाईसाठी दावा दाखल केला; मात्र रेल्वेने हा दावा फेटाळून लावला. याविरोधात कुटुंबीयांनी हायकोर्टात अपील दाखल केले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्ट केले की, रेल्वेत चढताना झालेला अपघातही अनपेक्षित रेल्वे अपघात घटना या कक्षेत येऊ शकतो. त्यामुळे मृताच्या कुटुंबीयांना आठ लाखांची भरपाई द्यावी लागेल.