
‘रामरक्षा म्हणजे प्रभू श्री रामाचे रक्षण असून, सध्याच्या भाजप राजवटीमध्ये अयोध्येत प्रभू श्री रामाचे मंदिर लुटण्यात आले. श्री रामाची दानपेटी, अलंकार लुटले, सीतामाईचे मंगळसूत्र चोरले, ही अवस्था भाजपच्या राजवटीमध्ये आहे. ज्या श्री रामाने सत्ता दिली, त्याची लूट करताना भाजपला लाज वाटली नाही? हे आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत,’ असा घणाघात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला.
शिवसेनेच्या वतीने मोरगावमधील (ता. बारामती) मयूरेश्वर चौकात आयोजित केलेल्या रामरक्षा पठण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख उल्हास शेवाळे, संजय काळे, बारामतीचे तालुकाप्रमुख हनुमंत भापकर, पुण्याचे शहरप्रमुख वसंत मोरे यांच्यासह शिवसैनिक आणि रामभक्त नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
संजय राऊत म्हणाले, ‘प्रभू श्री रामाच्या मंदिरासाठी हजारो कारसेवकांनी बलिदान केले. त्यामध्ये आम्ही सगळे होतो. या आंदोलनात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी खरा राम उभा केला. अयोध्येत आंदोलन केले. बाबरी पाडल्यावर भाजपचे लोक पळून गेले होते. ‘आम्ही नाही पाडली,’ असे म्हणाले होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले, ‘जर बाबरी तोडण्यात माझ्या शिवसैनिकांचा सहभाग असेल, तर मला अभिमान आहे!’ त्यामुळे रामाचे रक्षण करण्याचा पूर्ण अधिकार शिवसेनेला आहे; भाजप आणि मिंध्यांना हा अधिकार नाही. ज्यांनी शिवसेनेचे चिन्ह चोरले, पक्ष पह्डला, आमदार-खासदार पह्डले, ते चोर आहेत. आपण रामस्मरण करून बारामतीमध्ये भाजप, आरएसएस कार्यालय आहेत, त्या ठिकाणी जाऊन जाब विचारा,’ असे आवाहनही संजय राऊत यांनी केले.
अयोध्येतून श्री राम परत वनवासात जातील!
‘देवाला घाबरायला पाहिजे; पण देव यांना घाबरत आहे. कारण हे चोर आहेत. अयोध्येतून श्री राम परत वनवासात जातील, अशी परिस्थिती भाजपच्या चोरांनी केली आहे. आम्ही रामरक्षा आंदोलन सुरू केले. आम्ही मुंबईला गेलो, नागपूरला आरएसएस कार्यालयासमोर हजारो लोकांच्या उपस्थितीत आंदोलन केले. पुणे, नाशिक, आता बारामतीमध्ये आम्ही मोठय़ा प्रमाणात रामरक्षा पठण आंदोलन करत आहोत. भाजपवाला दिसला की, विचारा, रामाची दानपेटी कोणी चोरली? सीतामाईचे मंगळसूत्र कोणी चोरले, ’ असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
…तरीही दानपेटीतील 1400 कोटी रुपये बाहेर काढले!
‘मोदींच्या खात्यात साडेदहा हजार कोटी आहेत. ‘पीएम केअर’ खात्यात हे पैसे आहेत. तरीही राम मंदिर दानपेटीतील 1400 कोटी रुपये बाहेर काढले. हे त्यांचे हिंदुत्व आहे. बारामतीकरांनो, जागे व्हा! खरा राम कुठे आहे ते शोधा,’ असे संजय राऊत म्हणाले.
भाजपसोबत असलेले सगळे ढोंगी हिंदुत्ववादी
रामाचे रक्षण करणारे आम्ही खरे लोक आहोत; भाजपचे लोक चोर, दरोडेखोर आहेत. या आंदोलनात बारामतीमधील इतर नेत्यांनाही बोलवायला पाहिजे होते; पण ते येणार नाहीत. कारण भाजपसोबत असलेले सगळे ढोंगी हिंदुत्ववादी आहेत,’ असा टोला राऊत यांनी लगावला.



























































