मी हात जोडतो, पण तुम्ही मुंबईला जाऊ नका! अब्दुल सत्तारांकडून मनोज जरांगे यांची मनधरणी; सरकारकडून झालेल्या चुका दुरुस्त करण्याची हमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यासाठी मिंधे गटाचे आमदार अब्दुल सत्तार आंतरवाली सराटीत पोहोचले. ‘मी हात जोडतो, पण तुम्ही मुंबईत जाऊ नका. सरकारकडून झालेल्या चुका दुरुस्त करण्याची हमी मी घेतो…’ असा शब्द अब्दुल सत्तार यांनी दिला. परंतु मनोज जरांगे यांनी ‘सरकारने २८ ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य न केल्यास आपण मुंबईत मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यासमोर आंदोलन करणार म्हणजे करणारच!’ असे ठणकावून सांगितले.

५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांसह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्टपासून आंतरवाली सराटीत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला होता. जरांगे यांनी केलेल्या अचानक हल्ल्यामुळे मिंधे गट अस्वस्थ झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आज मिंधे गटाचे आमदार अब्दुल सत्तार हे मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी आंतरवालीत आले होते. दोघांमध्ये तीन तासांपेक्षा जास्त चर्चा झाली. यावेळी मनोज जरांगे यांनी ‘एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मराठा समाजाला कमालीची आस्था होती, परंतु ती सहानुभूती त्यांनी गमावली आहे. आता त्यांनी आमचे तळतळाट घेऊ नयेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही माझे हेच सांगणे आहे’, असेही जरांगे म्हणाले. ‘एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा संजय शिरसाट मोठे आहेत का?’ असा टोलाही त्यांनी लगावला.

आंदोलन करा, पण मुंबईला जाऊ नका

‘मनोज जरांगे यांना आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. सरकारकडून काही चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करण्याची मी हमी घेतो. पण तुम्ही मुंबईला जाऊ नका, मी हात जोडतो’ अशी विनवणी यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगे यांना केली. मात्र हा निर्णय सरकारच्या भूमिकेवर अवलंबून असल्याचे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले. त्यावर सरकार आणि मराठा समाजात संघर्ष होऊ नये, असा आमचा प्रयत्न आहे, असे सत्तार यांनी स्पष्ट केले. मात्र त्यावर पलटवार करत मनोज जरांगे यांनी ‘तुमचे सरकार थेट गोळ्या घालते!’ असे म्हटले.