मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाला आमचा पाठिंबा नाही! न्यूयॉर्कचे महापौर ममदानी यांनी मांडली स्पष्ट भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या न्यूयॉर्कमधील ‘मॅडिसन स्क्वेअर गार्डन’ येथील नियोजित कार्यक्रमाला न्यूयॉर्क शहराचे महापौर जोहरान ममदानी यांनी विरोध दर्शवला आहे. मात्र, हा एक खाजगी कार्यक्रम असल्याने तो रद्द करण्याचे कायदेशीर अधिकार शहराच्या प्रशासनाकडे नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सुरू असलेल्या जागतिक संपर्क अभियानाचा एक भाग म्हणून मोहन भागवत २९ ऑगस्ट रोजी अमेरिकेतील सुमारे ५,००० अनिवासी हिंदुस्थानींना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाला अनेकांनी विरोध दर्शवला आहे तसेच त्याविरोधात शहरात निदर्शने सुरू आहेत. याबाबत मंगळवारी एका पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना महापौरांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

न्यूयॉर्क शहराचे पहिले हिंदुस्थानी वंशाचे महापौर असलेले जोहरान ममदानी म्हणाले, “मी या सभेचे समर्थन करत नाही, परंतु खाजगी कार्यक्रम रद्द करण्याचा अधिकार शहराच्या अखत्यारीत येतो की नाही, हे मला ठाऊक नाही. मी या शहराचा पहिला हिंदुस्थानी वंशाचा महापौर असून माझ्या आईचे संपूर्ण कुटुंब आजही हिंदुस्थानात राहते. हिंदुस्थान बाबत मला जे सांगितले गेले आहे माझ्या मनात जी हिंदुस्थानची प्रतिमा आहे ती सर्वसमावेशक आणि धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताकाची आहे. जिथे प्रत्येक नागरिकाला समान अधिकार आहेत. कोणा एका घटकाला बहिष्कृत करणाऱ्या किंवा भेदभाव करणाऱ्या राजकीय चळवळींना आपला तीव्र विरोध आहे”,

“केवळ एक मी एक हिंदुस्थानी वंशाचा नागरिक म्हणून नव्हे, तर जात, वर्ण, धर्म आणि पंथाचा विचार न करता प्रत्येक व्यक्तीला आपले मानणाऱ्या या शहराचा महापौर म्हणूनही माझा अशा विचारसरणीला विरोध आहे.”

नागरी हक्क संघटनांकडून कार्यक्रमाला तीव्र विरोध

मोहन भागवत यांच्या या कार्यक्रमाविरोधात न्यूयॉर्कमधील अनेक मानवाधिकार व आंतरधर्मीय संघटना आक्रमक झाल्या आहेत. ‘हिंदुज फॉर ह्युमन राइट्स’ (Hindus for Human Rights), ‘इंडियन अमेरिकन मुस्लिम कौन्सिल’ (IAMC) आणि ‘इंटरफेथ सेंटर ऑफ न्यूयॉर्क’ या संघटनांनी न्यूयॉर्क सिटी हॉलबाहेर पत्रकार परिषद घेऊन हा कार्यक्रम तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.