बंगळुरू विमानतळावर तोंडात सोने लपवून तस्करीचा प्रयत्न, सीआयएसएफने प्रवाशाला घेतले ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंगळुरू विमानतळावर बुधवारी तोंडात सोने लपवून तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला. सोने तस्करी प्रकरणी हिंदुस्थानी नागरिकाला सीआयएसएफने ताब्यात घेतले आहे. हा प्रवासी सुमारे 82 ग्रॅम संशयास्पद सोने कॅप्सूलमध्ये भरून आणि त्या कॅप्सूल तोंडात लपवून तस्करी करण्याचा प्रयत्न करत होता, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-1 वर सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. गाझियाबादला जाणाऱ्या विमानात बसण्यापूर्वी सुरक्षा तपासणीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला. तो प्रवासी पहाटे दुबईहून आला होता, असे अधिकाऱ्याने सांगितले.

प्रवाशांच्या नियमित सुरक्षा तपासणीदरम्यान, तो प्रवासी संशयास्पद वागत असल्याचे सीआयएसएफ जवानांच्या लक्षात आले. तसेच तपासणी प्रक्रियेदरम्यान योग्य प्रतिसाद देत नव्हता, असे सीआयएसएफ अधिकाऱ्याने सांगितले. तपासणीदरम्यान त्या प्रवाशाच्या तोंडात लपवलेल्या स्थितीत सुमारे 82 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन कॅप्सूल सापडल्या. त्यानंतर त्या व्यक्तीला पुढील तपासासाठी स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले, असे अधिकाऱ्याने सांगितले. हे सोने शुद्धता तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे, असेही त्यांनी नमूद केले.