राजस्थानच्या मुख्य न्यायाधीशांना हटवा, सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची सरन्यायाधीशांकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थान हायकोर्टातील मुख्य न्यायाधीश संजीव प्रकाश शर्मा यांच्याकडून पदाचा गैरवापर होत आहे. ते श्रीमंतांना फायदा होईल, अशा पद्धतीने खटल्याच्या यादीत फेरफार करत आहेत, असा गंभीर आरोप सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संदीप मेहता यांनी केला आहे. पदाचा गैरवापर करणाऱ्या मुख्य न्यायाधीश संजीव शर्मा यांची तात्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी याप्रकरणी 2, 10 आणि 17 ऑगस्ट रोजी तीन पत्रे लिहली असून या पत्रांमधून गैरव्यवस्थापन, गैरव्यवहार, घराणेशाही आणि पक्षपातपणाचा आरोप मेहतांनी शर्मांवर केला आहे. तसेच ते मास्टर ऑफ द रोस्टर या नात्याने आपल्या अधिकारांचा वापर करून निवडक खटले स्वतःच्याच खंडपीठाकडे वर्ग करत असल्याचा दावा केला आहे.  दुसऱ्या खंडपीठासमोरील खटले अचानक आणि कोणत्याही वैध कारणाशिवाय स्वतःच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आल्याच्या घटना यापूर्वी देखील घडल्याचे मेहतांनी पत्रात म्हटले आहे.

सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी अशा खटल्यांची यादी मेहतांकडे मागितली होती तसेच, अशा प्रकारे लेखी देण्याची गरज नाही आणि योग्य त्या कारवाईचे आश्वासन दिले होते असे मेहतांनी म्हटले. न्यायमूर्ती मेहतांनी 10 ऑगस्ट रोजी लिहलेल्या पत्रात शर्मांचा पक्षपातीपणा सिद्ध करणारी दोन उदाहरणंही दिली आहेत. निवृत्तीच्या अगोदर शर्मा सिक्सर मारण्याच्या तयारीत असल्याचा उल्लेख मेहतांनी पत्रात केला आहे. न्यायाधीश संजू शर्मा यांच्या न्यायालयीन कामकाजाबद्दल असंख्य तक्रारी मिळाल्या आहेत. अनेक न्यायाधीश मला भेटले असून त्यांनी शर्मा यांच्या वर्तनाबद्दल दुःख व्यक्त केल्याचे त्यांनी पत्रात उल्लेख केला आहे.