
उत्सव असो वा ऊर्स…गणेशोत्सव असो वा ईद… महाप्रसाद म्हणून भाविकांना मिळणारे अन्नही शुद्ध आणि सुरक्षित असले पाहिजे, अशी भूमिका अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) घेतली आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सवातील महाप्रसादालाही नियमांचे बंधन असणार आहे. अन्न परवाना नसेल तर तिथेही कारवाई केली जाणार आहे.
हॉटेल्स आणि रेस्टॉरन्ट्समधील अन्न पदार्थांसाठी एफडीएचे जे नियम आहेत ते उत्सव, कार्यक्रमांमधील अन्न पदार्थांसाठीही लागू आहेत. धार्मिक कार्यक्रमांमधील महाप्रसादही त्या नियमांच्या चौकटीत येतो. येत्या गणेशोत्सवातील महाप्रसादावरही एफडीएची करडी नजर राहणार आहे. अन्न सुरक्षा कायद्यानुसार ‘फूड बिझनेस ऑपरेटर’ असलेल्या प्रत्येकाने नोंदणीकृत परवाना घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे गणेशोत्सवात महाप्रसादाचे कंत्राट घेणाऱ्या कॅटरर्सकडे अधिकृत परवाना असणे आवश्यक असणार आहे आणि महाप्रसादा वेळी अन्नपदार्थांच्या आणि पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षेची तसेच स्वच्छतेची संपूर्ण जबाबदारी त्याच्यासह आयोजकांचीही असणार आहे, असे एफडीएने स्पष्ट केले आहे.
विनापरवाना अन्नपदार्थ बनवणे हा थेट नियमभंग
मुंबई प्रेस क्लबमध्ये ‘मीट द मीडिया’ या कार्यक्रमात एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे सहभागी झाले होते. त्यांना यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता त्यांनीही याला दुजोरा दिला. विनापरवाना किंवा मानकांशिवाय अन्नपदार्थ तयार करणे, सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण करणे हा थेट नियमभंग आहे, त्यामुळे सण असो वा नसो, नियमांचे पालन ही एक नियमित प्रक्रिया आहे, असे ते म्हणाले.





























































