
भांडुप येथे एसआरए इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून कोसळलेल्या महिलेचा जीव एका झाडामुळे वाचला. झाडाच्या फांद्यांमध्ये महिला अडकली आणि मोठी दुर्घटना टळली. सनशाईन एसआरए इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून एक महिला अचानक खाली पडली. मात्र इमारतीखाली असलेल्या मोठ्या झाडाच्या फांद्यांमध्ये ती अडकल्याने थेट जमिनीवर आदळण्यापासून बचावली. हा प्रकार लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलीस व अग्निशमन दलाशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी परिस्थितीचा आढावा घेत अत्यंत काळजीपूर्वक बचावकार्य राबवले. फांद्यांमध्ये अडकलेल्या महिलेला सुखरूप खाली उतरवण्यात आले.


























































