
काळा घोडा परिसराचा पालिकेच्या माध्यमातून कायापालट करण्यात येणार आहे. यामध्ये हेरिटेज दिव्यांचे खांब, रस्तेदुरुस्ती, आवश्यक डागडुजी-सुशोभीकरण आणि झाडांवर आकर्षक रोषणाई करण्यात येणार आहे. यासाठी पालिका 9 कोटी 23 लाख 3 हजार 834 रुपयांचा खर्च करणार आहे. ‘काळा घोडा प्रिसिंक्ट डेव्हलपमेंट फेज-2 ए’ प्रकल्पांतर्गत हे काम करण्यात येत आहे.
काळा घोडा परिसराला नवा साज देण्यासाठी पालिकेकडून अनेक प्रकारची कामे हाती घेतली आहेत. यासाठी ‘काळा घोडा प्रिसिंक्ट डेव्हलपमेंट फेज-2 ए’ प्रकल्प हाती घेतला आहे. यामध्ये परिसराच्या सौंदर्यवर्धनासाठी मातीची सुधारणा, झुडपे व वृक्ष लागवड, टोपियरी कामे आणि इतर सुशोभीकरणाची कामे करण्यात येणार आहेत. ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी परिसरात 10 मीटर उंचीचे हेरिटेज दिव्यांचे खांब आणि 4.5 मीटर उंचीचे प्रकाशस्तंभ उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पांतर्गत सुधारित रस्ते, पादचारी मार्ग, पर्जन्यजल वाहिन्या, सांडपाणी वाहिन्या, रस्ता चिन्हे आणि लेन मार्किंग यांची देखभालही पंत्राटदाराकडून करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
असे होणार काम
‘काळा घोडा प्रिसिंक्ट डेव्हलपमेंट फेज- 2 ए’ प्रकल्पांतर्गत अंतर्गत रस्ते सुधारणा, सुशोभीकरण, वृक्षारोपण, आधुनिक प्रकाशयोजना, रस्त्यांचे मजबुतीकरण, उत्खनन, पीसीसी व डब्ल्यूएमएम कामे, बेसॉल्ट व ग्रॅनाईट दगडी फरसबंदी बसविणे तसेच नव्या चेंबरची उभारणी आणि विद्यमान चेंबरची दुरुस्ती आदी कामे केली जाणार आहेत.




























































