
कोपरगाव शहरातील रस्त्यांवर सोडण्यात येणाऱ्या मोकाट गोवंशांमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यानंतर कोपरगाव नगरपालिका प्रशासनाने सुरू केलेल्या धडक मोहिमेने चांगलाच वेग घेतला आहे. अवघ्या चार-पाच दिवसांत पालिकेने धरपकड केलेल्या जनावरांची संख्या शंभरच्या पुढे गेली आहे.यांतील 67 जनावरे कोकमठाण येथील गोशाळेत ठेवण्यात आली असून, 33 पेक्षा अधिक जनावरे नगरपालिकेच्या कोंडवाड्यात ठेवली आहेत.
नगरपालिकेच्या या धडक कारवाईमुळे मोकाट जनावरे रस्त्यावर सोडून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या गोमालकांचे धाबे दणाणले आहे. पकडलेली जनावरे सोडवण्यासाठी काही मालकांनी 20 ते 25 हजार रुपयांपर्यंतचा दंड भरण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, कारवाई सुरू असल्याने सध्या कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याची भूमिका मुख्याधिकारी अजित निकत यांनी घेतली आहे.
पालिकेच्या भूमिकेमुळे कारवाई केवळ कागदावर न राहता, प्रत्यक्ष रस्त्यावर उतरल्याचे चित्र आहे. मोकाट जनावरे पकडण्यासाठी नगरपालिका कर्मचारी युद्धपातळीवर काम करत असून, शहरातील विविध भागांत त्यांना यश मिळत आहे. चार ते पाच दिवसांत जवळपास 100 जनावरे पकडण्यात आली असून, त्यांतील 67 जनावरे गोशाळेत दाखल केली असून, तेथील क्षमता पूर्ण झाल्याने आणखी पकडलेली जनावरे नगरपालिका कोंडवाड्यात ठेवण्यात येत आहेत.
मोहीम थांबता कामा नये
मोकाट जनावरांचा प्रश्न वर्षानुवर्षे शहराला भेडसावत असताना आता पालिकेकडून धरपकड सुरू आहे. ही मोहीम कोणत्याही राजकीय दबावामुळे थांबता कामा नये. जनावरांच्या मालकांना दंडात्मक कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून त्यांच्यावर कायमस्वरूपी वचक बसेल, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.
मोकाट कुत्र्यांचाही प्रश्न मोठा
गोवंशांबरोबरच शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण, निर्बीजीकरण, लसीकरण आणि सुरक्षित व्यवस्थापनासाठी संबंधित नियमांनुसार स्वतंत्र मोहीम हाती घेण्याची मागणी होत आहे.
शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत कारवाई थांबवली जाणार नाही.
– पराग संधान, नगराध्यक्ष
नगरपालिका प्रशासन स्वतःची गोशाळा उभारण्याच्या तयारीत असून, ती लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
– अजित निकत, मुख्याधिकारी


























































