
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱया कसोटीत यशस्वी जैसवाल आणि वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडो यांच्यात जोरदार वाद झाला होता. आयसीसीने दोन्ही खेळाडूंना त्यांच्या सामना शुल्काच्या 25 टक्के दंड ठोठावला आणि एक डिमेरिट पॉइंट दिला. यापूर्वी जूनमध्ये हिंदुस्थान ‘अ’ संघाकडून खेळताना 15 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीचाही श्रीलंकेच्या खेळाडूंशी वाद झाला होता. दोन्ही प्रकरणांमध्ये कठोर कारवाई न झाल्याने हिंदुस्थानचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर संतप्त झाले आहेत आणि त्यांनी आयसीसी व बीसीसीआयकडे महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत.
संजय मांजरेकर काय म्हणाले…
‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बोलताना मांजरेकर म्हणाले की, ‘मैदानातील वाईट वर्तनानंतरही खेळाडूंना किरकोळ दंड देऊन सोडून दिल्यास त्यांना अशा चुका पुन्हा करण्यास प्रोत्साहन मिळते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे वैभव आणि आता यशस्वी. या दोघांनी बेशिस्त वर्तन करूनही तुम्ही त्यांना सोडून देत आहात. तुम्ही त्यांना हेच वर्तन पुन्हा करण्यास प्रोत्साहन देत आहात. हे खेळासाठी आणि त्यांच्या स्वतःच्या भविष्यासाठी चांगले नाही. आयसीसी आणि बीसीसीआयने हे नियम अधिक कडक केले पाहिजेत.’
यशस्वी आणि फर्नांडो यांच्यात टक्कर
कोलंबो कसोटीत हिंदुस्थानच्या पहिल्या डावादरम्यान जैसवाल 45 धावा करून फर्नांडोच्या गोलंदाजीवर बाद झाला. पॅव्हेलियनमध्ये परतताना फर्नांडोच्या वक्तव्यावर जैसवाल संतापला. त्यांच्यात जोरदार वाद झाला ज्याचे पर्यवसान समोरासमोरच्या टकरीत झाले. या घटनेसाठी आयसीसीने केवळ दंड आणि डिमेरिट पॉइंट लावला.
वैभवची झटापटीची घटना
जूनमध्ये त्रिकोणीय मालिकेत श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये झालेल्या पराभवानंतर वैभवचा संयम सुटला. या वादादरम्यान त्याने श्रीलंकेच्या विशन हलंबगेला ढकलले. इतक्या लहान वयात अशा आक्रमक वर्तनानंतरही कठोर कारवाईचा अभाव असल्याबद्दल मांजरेकर यांनी चिंता व्यक्त केली.






























































