साखरेचे दर कमी होण्याची शक्यता; ३ ते ३.५ लाख टन साखर बाजारात येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील साखरेची उपलब्धता वाढवून बाजारातील दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचा परिणाम आता दिसू लागण्याची शक्यता आहे. शुल्कमुक्त कच्ची साखर आयात करून तिच्यावर प्रक्रिया केल्यानंतर निर्यात करणाऱ्या हिंदुस्थानी साखर रिफायनर्सकडे सध्या उपलब्ध असलेली सुमारे ३ ते ३.५ लाख टन प्रक्रिया केलेली साखर देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारातील साखरेचा पुरवठा तातडीने वाढून दर कमी होण्यास मदत होऊ शकते.

गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने १० लाख टन कच्ची साखर शुल्कमुक्त आयात करण्यास परवानगी दिली. त्याचबरोबर निर्यातीसाठी राखून ठेवलेली प्रक्रिया केलेली साखर देशांतर्गत बाजारात विकण्याची मुभाही रिफायनर्सना देण्यात आली. अधिकाऱ्यांच्या आणि उद्योग क्षेत्रातील सूत्रांच्या माहितीनुसार, प्रक्रिया केलेली किमान ३ लाख टन साखर तातडीने बाजारात उपलब्ध होऊ शकते.

यानंतर होणारी १० लाख टन कच्च्या साखरेची आयातही बाजारातील भविष्यातील पुरवठ्याची गरज भागवण्यास मदत करेल. त्यामुळे साखरेचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता कमी होऊन बाजारातील दर स्थिर राहण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

दहा दिवसांत एक्स-मिल दरात २० टक्के घट

दरम्यान, साखरेच्या एक्स-मिल दरात गेल्या दहा दिवसांत सुमारे २० टक्क्यांची घट झाली आहे. बुधवारी कोल्हापुरात साखरेचा घाऊक दर सुमारे ४८ रुपये किलो, तर उत्तर प्रदेशात तो सुमारे ५३ रुपये किलो होता.

एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांत घाऊक दर ४८ रुपयांवरून थेट ५८ ते ६० रुपये किलोपर्यंत वाढला होता. या दरवाढीमागे प्रत्यक्ष साखरेचा तुटवडा नसून सट्टेबाजी आणि साठेबाजी हे प्रमुख कारण असल्याचे त्यांनी सांगितले.

सणासुदीपूर्वी ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता

इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे महासंचालक दीपक बल्लानी यांनी सांगितले की, साखरेचे दर तर्कसंगत पातळीवर आणण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांचे परिणाम दिसू लागले आहेत. गेल्या काही दिवसांत घाऊक साखरेच्या दरात जवळपास २० टक्क्यांची घट झाली असून, त्याचा परिणाम लवकरच किरकोळ बाजारातील दरांवरही दिसून येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

देशात साखरेची पुरेशी उपलब्धता असल्याचे सांगत आगामी सणासुदीच्या काळात ग्राहकांना वाजवी दरात साखर उपलब्ध होईल, असा विश्वासही बल्लानी यांनी व्यक्त केला.

किरकोळ बाजारात साखर ६५ रुपये किलो

बुधवारी देशातील साखरेचा सरासरी किरकोळ दर सुमारे ६५ रुपये किलो होता. घाऊक दरातील घट, प्रक्रिया केलेली साखर देशांतर्गत बाजारात आणण्यास दिलेली परवानगी आणि १० लाख टन कच्च्या साखरेची शुल्कमुक्त आयात या निर्णयांमुळे आगामी काळात किरकोळ बाजारातील साखरेचे दर कमी होण्याची शक्यता आहे.