
देशभरात रक्षाबंधनचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र, देशात अशी काही गावे आहेत, जेथे रक्षाबंधन साजरे करण्यात येत नाही. तर या सणाला दुःख व्यक्त करण्याची परंपरा काही समाजात आहे. हा सण या गावांमध्ये साजरा न करण्यामागे काही कारणे, मान्यता आणि रुढी आहेत.
उत्तर प्रदेशातील मुरादनगरमधील सुठारी गावातील छबडिया गोत्राचे लोक रक्षाबंधनचा सण साजरा करत नाहीत. या समाजाचे लोक स्वतःला पृथ्वीराज चौहान यांचे वशंज मानतात. याच दिवशी मोहम्मद घौरीने पृथ्वीराज चौहानवर आक्रमण केले होता. चौहानचे वंशज या गावात असल्याचे समजल्यावर घौरीने हे गाव उद्ध्वस्त केले होते. या वंशाच्या लोकांना हत्तीच्या पायी देऊन त्यांची हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यातून सोहरणसिंह राणा यांची पत्नी राजवती माहेरी गेल्याने बचावली होती. तिने लखी आणि चुपडा या मुलांना सोबत घेऊन पुन्हा हे गाव वसवले होते. या युद्धात झालेल्या नरसंहाराची आठवण म्हणून या गावातील लोक हा सण साजरा करत नाही. हा सण साजरा करण्याऱ्याच्या जीवनात अघटीत घटना घडतात अशी मान्यता आहे.
उत्तर प्रदेशातील हापूड गावातील धौलाना साठामधील लोक स्वतःला महाराणा प्रताप यांचे वंशज मानतात. याच दिवशी महाराणा प्रताप यांचा पराभव झाला होता. त्यात मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली होती. त्या दिवसाची आठवण म्हणून या गावातही रंक्षाबंधन साजरे होत नाही. या दिवशी या समाजाकडून शोक व्यक्त करण्यात येतो.
उत्तर प्रदेशातीलच संभल जिल्ह्यातील बेनीपूर या यादवबहूल गावात एका अजब गोष्टीमुळे हा सण साजरा करण्यात येत नाही. अनेक पिढ्यांपूर्वी यादवांच्या एका मानलेल्या बहीणीने रक्षाबंधनची ओवाळणी म्हणून गावांची जमीनदारी मागितली. वचनाला पक्के असलेल्या यादवांनी लगेचच तिला जमीनदारी दिली. त्यानंतर ठाकूर समाजाची असलेल्या त्या बहीणीच्या वंशजाकडे जमीनदारी गेली आणि यादव निर्वासीत झाले. नंतर ते बेनीपूर या गावात स्थायिक झाले. या घटनेनंतर या समाजात रक्षाबंधन साजरे होत नाही. कोणतीही बहीण भावाचे संसार उद्ध्वस्त करू नये यासाठी पूर्वजांनी हा सण साजरा करू नये अशी प्रथा पाडल्याचे सांगण्यात येते.


























































