
कोकणवासीयांच्या जिव्ह्याळ्याचा सण गणेशोत्सव जवळ आला आहे. गणपती सणानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. गणपतीनिमित्त मुंबई-मडगाव दरम्यान चार अतिरिक्त विशेष गाड्या धावणार आहेत. गणपती रिझर्व्ह्ड स्पेशल ट्रेनसाठी बुकिंग 29 ऑगस्ट 2026 पासून सुरू होणार आहे.
गाडी क्र. 01007 विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 11 सप्टेंबर 2026 आणि 13 सप्टेंबर 2026 रोजी 00.40 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 15.30 वाजता मडगावला पोहोचेल. गाडी क्र. 01008 विशेष गाडी मडगाव येथून 11 सप्टेंबर 2026 आणि 13 सप्टेंबर 2026 रोजी 16.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 08.15 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.
या विशेष गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावरडा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवाळी, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमळी या ठिकाणी थांबे देण्यात येतील.


























































