
ठाणे, मुंब्रा आणि कळव्यासारख्या भागातून आलेल्या तरुणांनी परळच्या लक्ष्मी कॉटेजजवळ मध्यरात्री धुडगूस घातल्याचा प्रकार घडला. यावेळी दोन गट एकमेकांना भिडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज करीत मुंबईबाहेरून आलेल्या तरुणांना निघून जाण्यास भाग पाडल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेमुळे परळमध्ये तणावाचे वातावरण असल्याने पोलिसांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
भोईवाडा पोलिसांनी बुधवारी रात्री सेंट्रल रेल्वे वर्कशॉपसमोर नाकाबंदी लावली होती. त्यावेळी पोलीस कर्णकर्कश हॉर्न व मॉडिफाय सायलन्सर लावून बेदरकारपणे दुचाकी चालविणाऱयांवर कारवाई करत होते. त्याच वेळी दक्षिण मुंबईवरून आलेल्या 50 ते 60 दुचाकीस्वारांनी पुढे काही अंतरावर जाऊन आपल्या दुचाकी थांबवल्या आणि वाहतुकीला अडथळा होत असतानाही तेथून न हटता ‘अल्ला हु अकबर’ अशा घोषणा देत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्याच वेळी लक्ष्मी कॉटेज येथे 30 ते 40 तरुण एकवटले व त्यांनीदेखील रस्त्यावर येऊन ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली.
याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात रेहान सय्यद (19), अदिल खान (19), मिराज रईस (18) या तिघांसह अन्य अनोळखी तरुणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.
शिवसैनिकांचा पहारा
परळमधील तणावाची स्थिती पाहता स्थानिक शिवसैनिकांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तणावाचे वातावरण असल्याने शाखाप्रमुख मिनार नाटळकर, नगरसेविका भारती पेडणेकर यांच्यासह शिवसैनिकांनी या ठिकाणी रात्रभर थांबून परिस्थिती नियंत्रणात राखण्याचे काम केले. या घटनेची सविस्तर माहिती आमदार अजय चौधरी घेत पोलिसांकडून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच या घटनेतील जखमींची घरी जाऊन विचारपूसही केली.
































































