
अडीच वर्षांनंतर मुंबई महापालिकेचे महापौरपद सव्वा वर्षासाठी मिंधे गटाकडे येणार असल्याची चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी याबाबत विधान केले. यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंधे गटावर हल्ला चढवला. मिंधे गटाला फुकट काहीही मिळत नाही, त्यांचा डोलारा विकतचा आहे, असा टोला संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी मुंबईत माध्यमांशी बोलताना लगावला.
मिंधे गट सत्ता विकत घेण्यासंदर्भात बदनाम आहे आणि हा त्यांचा इतिहास आहे. आता सव्वा वर्षांचे महापौरपद विकत घेण्यासाठी त्यांनी दिल्ली सव्वाशे कोटी मोजले की सव्वा हजार कोटी मोजले त्याची माहिती मी घेतोय. त्यांना फुकट काहीही मिळत नाही. हा जो डोलारा आहे तो विकतचा आहे. त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मोजावे लागतात आणि ते मोजतात. मुंबईचे महापौपद सुद्धा किती खोक्यांना ते विकत घेताहेत याची माहिती लवकरच येईल. भाजपमध्ये महाराष्ट्रप्रेमी खूप लोक आहेत, जे अशा प्रकारची माहिती जनतेसमोर यावे यासाठी जास्त प्रयत्न करत असतात, असे संजय राऊत म्हणाले.
जयंत पाटील यांचे एक भाषण संजय राऊत यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून शेअर केले. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, मी स्वत: श्रद्धा आणि निष्ठा या दोन शब्दांना मानतो. आमच्यासारख्यांचे जे राजकारण आहे, ते या दोन शब्दांवर उभे आहे. श्रद्धा आणि निष्ठा या पांडुरंगाच्या विटा आहेत. त्या विटेवर आम्ही उभे आहोत. त्याच्यामुळे कुणी श्रद्धा आणि निष्ठा याला महत्व देऊन जिथे आहोत तिथेच राहण्याचा निर्णय घेऊन राजकारण करत असेल तर त्याचे कौतुक केले पाहिजे.
गेल्या काही काळापासून मी पाहतोय जयंत पाटीलांविषयी खूप अफवा पसरल्या जात आहेत. जयंत पाटील पवार साहेबांना सोडताहेत, ते भाजपमध्ये जाताहेत, अमित शहांच्या राष्ट्रवादीत चालले वगैरे… या सगळ्या अफवांना त्यांनी काल पूर्णविराम दिला. त्यांनी निष्ठेची सुंदर व्याख्या काल त्यांच्या कार्यकर्त्यासमोर तळमळीने मांडली. शरद पवारांनी राजीनामा दिला तेव्हा सगळ्यात आधी जयंत पाटील यांना हुंदका फुटला. त्यांच्या निष्ठेवर, विचारधारेवर काही लोकांनी शंका घेण्याचा प्रयत्न केला. काल त्यांनी जे उत्तर दिले ते महाराष्ट्रात, घराघरात पोहोचले आहे, असे संजय राऊत म्हणाले.
‘झी’ टीव्हीचे संस्थापक व राज्यसभेचे माजी खासदार सुभाष चंद्रा यांच्यावरील 22 हजार कोटींचे कर्ज अवघ्या साडेसहा कोटींमध्ये मिटवले जाणार आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, 22 हजार कोटींच्या कर्जाची 6 कोटींमध्ये मांडवली करता हे कोणते अर्थकारण आहे? मग विजय मल्ल्याला देश का सोडावा लागला? निरव मोदी, मेहुल चोक्सीवर कारवाई का केली? मल्ल्याने सहा हजार कोटींचे कर्ज घेतले आणि 14 हजार कोटींची परतफेड केली. त्याच्यामागे ईडी-सीबीआय लावून देश सोडून देण्यास भाग पाडले. बाकी भाजपच्या मित्र परिवाने हजारो कोटींची देशाची तिजोरी लुटली, जनतेचा पैसा, विमा कंपन्या, एलआयसीचा पैसा लुटला.. त्यांना माफ करता? सर्वसामान्याने 5-25 हजारांचे कर्ज घेतले आणि एखादा हप्ता थकला की बँकेचे लोक येऊन घर, सामान जप्त करतात, असेही संजय राऊत म्हणाले.
शिवाली, हे खरंय S S S सुभाषचंद्रांच्या 22 हजार कोटींच्या कर्जाची साडेसहा कोटींमध्ये सेटलमेंट!

























































