
एकीकडे जिथे रक्ताची नातीही स्वार्थासाठी तुटताना दिसतात, तिथे हरयाणातील एका भावाने बहिणीसाठी दिलेला त्याग माणुसकीची एक नवी मिसाल ठरला आहे. रोहतक येथील राजेश गुप्ता यांनी आपली किडनी दान करून गंभीर आजारी बहिणीला जीवनदान दिले. भावाने बहिणीला दिलेली ही ‘जीवनाची भेट’ बंधुप्रेमाचा एक अनोखा आणि प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
रोहतकच्या बाबरा मोहल्ला येथील रहिवासी असलेल्या राजेश गुप्ता यांची धाकटी बहीण प्रियांका हिचा विवाह रेल्वे रोड येथील रहिवासी मनोज गोयल यांच्याशी झाला आहे. एका खासगी महाविद्यालयात कार्यरत असलेल्या राजेश यांच्या बहिणीला किडनीचा गंभीर आजार झाला होता. कोविड-19 महामारीनंतर प्रियांका यांची प्रकृती अधिकच खालावली आणि दिल्लीच्या द्वारका येथील आकाश हेल्थकेअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. या काळात प्रियांका यांचे अवयव निकामी होण्याच्या मार्गावर होते आणि त्यांना आठवड्यातून तीन वेळा डायलिसिस करावे लागत होते.
कोविडच्या कठीण काळात प्रियांका यांच्यासाठी कोणताही सुयोग्य दाता मिळत नव्हता. बहिणीची ही बिकट अवस्था पाहणे राजेश यांना असह्य झाले. त्यांनी तात्काळ बहिणीच्या सासरच्या घरी धाव घेतली आणि स्वतःची किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीयांच्या संमतीनंतर 16 मार्च 2021 रोजी आकाश हेल्थकेअरमध्ये यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली. आकाश हेल्थकेअरचे नेफ्रोलॉजी आणि किडनी ट्रान्सप्लांट विभागाचे प्रधान संचालक डॉ. विक्रम कालरा यांनी सांगितले की, प्रियांका यांना उच्च रक्तदाबामुळे किडनीचा आजार झाला होता, जो वेळेवर उपचार न मिळाल्याने वेगाने वाढला. भावाने वेळेत पुढे येऊन किडनी दान केल्यामुळेच प्रियांका यांचा जीव वाचू शकला. .आज दोन्ही भावंडे पूर्णपणे निरोगी आणि सुरक्षित आहेत. 11 वर्षांच्या मुलाची आई असलेल्या प्रियांका यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, भावाने दिलेले हे जीवनदान त्यांच्यासाठी जगातील सर्वात मोठी भेट आहे. रक्तदान आणि अवयवदानातून गरजू व्यक्तींना नवीन आयुष्य मिळू शकते, संदेशही त्यांनी दिला. राजेश यांनी दरवर्षी रक्षाबंधनाला बहीण आनंदाने घरी यावी आणि नेहमी निरोगी राहावी, हीच आपली इच्छा असल्याचे म्हटले आहे.


























































