
बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. नवविवाहित पत्नीला रक्षाबंधनानिमित्त माहेरी सोडण्यासाठी निघालेल्या पतीला मोठा धक्का बसला आहे. रस्त्यात पतीने बाईक थांबवताच पत्नीने त्याला मिठाई आणण्यासाठी पाठवले आणि याच संधीचा फायदा घेत ती तिथून गायब झाली. पतीने सर्वत्र शोध घेतला, मात्र ती न सापडल्याने अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी अवघ्या दोन तासांत या प्रकरणाचा छडा लावून महिलेला तिच्या प्रियकराच्या ताब्यातून सुखरूप शोधून काढले.
मिळालेल्या माहितीनुसार, भागलपूर जिल्ह्यातील नारायणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चक्रामी येथील रहिवासी पिंटू कुमार याने 7 ऑगस्ट रोजी पूर्णिया जिल्ह्यातील सुखसेना येथील रहिवासी तारावती कुमारी हिच्याशी विवाह केला होता. लग्नानंतर अवघ्या 19 दिवसांनी, म्हणजेच रक्षाबंधना दिवशी पिंटू आपल्या पत्नीला माहेरी सोडण्यासाठी दुचाकीवरून निघाला होता. दोघेही पूर्णिया-मधेपुरा सीमेजवळील चौसा बस स्थानकावर पोहोचले असता थोडा वेळ थांबले. या दरम्यान तारावतीने पतीला रक्षाबंधनासाठी मिठाई घेऊन येण्यास सांगितले. पिंटू पत्नीला बाईकजवळ सोडून जवळच्या दुकानात गेला. मात्र, तो मिठाई घेऊन परत आला असता तारावती तिथून गायब झाली होती. पिंटूने आसपासच्या परिसरात खूप शोध घेतला, पण तिचा काहीच पत्ता लागला नाही. अखेर त्याने सासरच्या मंडळींना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. नातेवाईकही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी शोध सुरू केला. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही तारावतीचा ठावठिकाणा न लागल्याने मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस पथकातील राहुल राज आणि चालक चंद्रशेखर यादव यांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी कुटुंबीयांकडून माहिती घेऊन मोबाईल टॉवर लोकेशन आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे शोध सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांचे पथक परबत्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरवा येथे राहणाऱ्या उत्कर्ष कुमार याच्या घरी पोहोचले. पोलिसांनी उत्कर्षला ताब्यात घेऊन कडक चौकशी केली असता, त्याने तारावतीला राघोपूर बहतारा येथील आपल्या आईच्या घरी ठेवल्याची कबुली दिली. प्रियकराकडून माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ दुसऱ्या पथकाला तिथे पाठवले. मध्यरात्री 12 च्या सुमारास तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत नववधूला ताब्यात घेतले. पोलिसांनी तिचा प्रियकर उत्कर्ष कुमार यालाही अटक केली असून पुढील कारवाईसाठी दोघांना परबट्टा पोलीस ठाण्यात सोपवण्यात आले आहे. पोलीस आणि कुटुंबीयांच्या माहितीनुसार, तारावतीचे लग्नापूर्वीपासूनच उत्कर्षसोबत प्रेमसंबंध होते. ही बाब तिच्या कुटुंबीयांनाही ठाऊक होती, तरीही त्यांनी तिचा विवाह पिंटूशी लावून दिला होता. रक्षाबंधनाला माहेरी जात असल्याची माहिती तारावतीने आधीच उत्कर्षला दिली होती. त्यानुसार तिने चौसा बस स्टँडवर पतीला मिठाई आणायला पाठवले आणि आधीच ठरल्याप्रमाणे प्रियकराच्या बाईकवरून ती पसार झाली. लग्नानंतर अवघ्या १९ दिवसांत घडलेल्या या घटनेची संपूर्ण परिसरात जोरदार चर्चा सुरू असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

























































