
महिलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले तर त्या स्वतःची सुरक्षा करण्यास सक्षम आणि स्वयंसिद्ध होऊ शकतात. या उद्देशाने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने 2003 मध्ये ‘स्वयंसिद्धा’ महिला स्वसंरक्षण प्रशिक्षण योजना सुरू केली होती. मात्र महिलांच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा सिद्ध झालेल्या महायुती सरकारने ती योजनाच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ती बंद करण्यासाठी सरकारने कारस्थान करून पाच वर्षे त्या योजनेला निधीच दिला नाही आणि आता कालबाह्य झाल्याचे सांगत ती गुंडाळली जात आहे.
शिक्षण, नोकरी आणि व्यवसायासाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांना संकटसमयी स्वतःचे संरक्षण करता यावे हा या प्रशिक्षणामागचा उद्देश होता. त्यात महिलांना ज्युडो, तायक्वाँदो, मार्शल आर्ट, लाठी-काठी अशा विविध स्वसंरक्षणाच्या तंत्रांचे प्रशिक्षण दिले जात होते. त्याचबरोबर शारीरिक तंदुरुस्ती, योग आणि हास्योपचाराच्या माध्यमातून महिलांचा आत्मविश्वास वाढविला जात होता.
महिला सुरक्षेच्या आणि सक्षमीकरणाच्या घोषणा करायच्या आणि दुसरीकडे महिलांच्या आत्मसंरक्षणासाठी असलेली योजनाच बंद करायची असा महायुती सरकारचा दुटप्पीपणा या निर्णयातून समोर आला आहे. गेली पाच वर्षे या योजनेसाठी अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही अशी धक्कादायक बाबही सरकारच्या आढाव्यातून समोर आली आहे.



























































