
पंजाबमधील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणानंतर (SIR) आम आदमी पक्षाचे (AAP) माजी राज्यसभा खासदार आणि आता भाजपमध्ये गेलेले राघव चड्ढा यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आल्याच्या मुद्द्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणावरून चड्ढा आणि आम आदमी पक्ष आमनेसामने आले आहेत.
चड्ढा यांनी पंजाबमधील आप सरकारवर ‘राजकीय सूडबुद्धीचे राजकारण’ केल्याचा आरोप केला. पंजाबमधून विद्यमान राज्यसभा खासदार असून, त्यांचे मतदार ओळखपत्र मोहाली येथील पत्त्यावर नोंदणीकृत आहे. असे असतानाही SIRनंतरच्या प्रारूप मतदार यादीत त्यांचे नाव ‘स्थलांतरित’ म्हणून वर्गीकृत करण्यात आल्याचा दावा चड्ढा यांनी केला.
‘चड्ढा पंजाबमध्ये राहतच नाहीत’ : सौरभ भारद्वाज
चड्ढा यांच्या आरोपांना आपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनी प्रत्युत्तर दिले. “राघव चड्ढा पंजाबमध्ये नाही, तर दिल्लीत राहतात,” असा दावा त्यांनी केला. जर चड्ढा पंजाबमध्ये राहत नसतील, तर त्यांचे मत पंजाबमध्ये का असावे, असा सवाल भारद्वाज यांनी उपस्थित केला. SIRच्या नियमांचा दाखला देत त्यांनी सांगितले की, मतदार आपल्या नोंदणीकृत पत्त्यावर राहत नसल्याचे आढळल्यास त्याचे नाव मतदार यादीतून वगळले जाऊ शकते.
दिल्लीतही याच नियमांनुसार घर बदलल्यामुळे लाखो मतदारांना ‘स्थलांतरित’ म्हणून चिन्हांकित करून त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याचा दावा भारद्वाज यांनी केला.
चड्ढा यांनी ‘एक्स’वरील पोस्टद्वारे आपली भूमिका पुन्हा स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, मतदार यादीतील नाव किंवा माहिती दुरुस्त करण्यासाठी सध्या ‘दावे आणि हरकती’ प्रक्रिया सुरू आहे. अंतिम मतदार यादी ऑक्टोबर 2026 मध्ये प्रसिद्ध होणार आहे.
SIRच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपलब्ध असलेल्या उपायांचा आपण आधीच वापर करत असल्याचे चड्ढा यांनी सांगितले. मात्र, “हा केवळ कारकुनी चुकीचा प्रकार वाटत नाही. हा राजकीय सूडबुद्धीचा प्रकार आहे,” असा आरोप त्यांनी केला.
‘पंजाबमध्ये राहत नसतील तर मत काढून टाकले पाहिजे’
पत्रकार परिषदेत बोलताना भारद्वाज यांनी चड्ढा यांच्यावर आणखी टीका केली. “राघव चड्ढा पंजाबमध्ये राहत नसतील, तर त्यांचे मत तेथून काढून टाकले पाहिजे,” असे ते म्हणाले.
चड्ढा पूर्वी ‘राइट टू रिजेक्ट’ अर्थात लोकप्रतिनिधी नाकारण्याच्या अधिकाराबाबत बोलत होते, याची आठवण करून देत भारद्वाज यांनी त्यांच्यावर टीका केली. “ज्या व्यक्तीने राइट टू रिजेक्टबाबत भाष्य केले, त्यांनी आता तो नियम स्वतःवर लागू करावा,” असे ते म्हणाले.
भारद्वाज यांनी पुढे चड्ढा यांच्या राज्यसभा सदस्यत्वावरही प्रश्न उपस्थित केला. संसदेतून ‘राइट टू रिजेक्ट’ विषयावर रील्स बनवणाऱ्या चड्ढा यांना आता संसदेत जाण्याचा किंवा राज्यसभा सदस्य म्हणून मिळालेल्या सरकारी निवासस्थानात एक दिवसही राहण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही, असा दावा त्यांनी केला. “ते कोणत्या नैतिक अधिकाराने हे पद भूषवत आहेत, असा प्रश्न माध्यमांनी त्यांना विचारला पाहिजे,” असे भारद्वाज म्हणाले.




























































