
दक्षिण कोरिया होर्मुझच्या सामुद्रधुनीत आपले सैन्य आणि लष्करी साधने पाठवण्याच्या तयारीत आहे. या महत्त्वाच्या सागरी मार्गावरील व्यावसायिक जहाजांची सुरक्षित वाहतूक आणि फ्रीडम ऑफ नेव्हिगेशन सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलले जात आहे, असे वृत्त आहे. संसदेच्या मंजुरीनंतर या वर्षाच्या अखेरीस प्रत्यक्ष सैन्य तैनात केले जाण्याची शक्यता आहे.
टीव्ही९ भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण कोरियाच्या स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार सैन्य पाठवण्याच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करत आहे. कॅबिनेटच्या चर्चेनंतर याच महिन्यात संसदेत मंजुरीसाठी हा प्रस्ताव मांडला जाऊ शकतो.
कोणत्या तुकड्या तैनात होणार?
दक्षिण कोरियाचे सरकार सध्या तैनातीसाठी विविध पर्यायांची चाचपणी करत आहे. यामध्ये सागरी गस्ती विमाने, लॉजिस्टिक सपोर्ट जहाजे आणि समुद्रात पेरलेले भूसुरुंग शोधून ते निकामी करणाऱ्या विशेष तुकड्यांचा समावेश असू शकतो. या संभाव्य मोहिमेची व्याप्ती आणि त्यात दक्षिण कोरियाची नेमकी भूमिका काय असेल, हे निश्चित करण्यासाठी अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स यांसारख्या देशांशी चर्चा सुरू आहे.
सरकारची अधिकृत भूमिका काय?
दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. त्यांनी स्पष्ट केले आहे की, होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांच्या मुक्त आणि सुरक्षित संचारासाठी योगदान देण्याच्या व्यावहारिक मार्गांवर सध्या फक्त चर्चा सुरू आहे. मात्र सैन्य तैनातीचा अंतिम निर्णय झाल्याच्या बातम्या अद्याप तथ्यांवर आधारित नाहीत.



























































