
एकामागून एक दोन धडाकेबाज विजय मिळवल्यानंतर हिंदुस्थानचा महिला संघ पाकिस्तानला धूळ चारत हॅटट्रिक साजरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. हिंदुस्थानने थायलंड आणि हाँगकाँग यांच्यावर दणदणीत विजय साकारले. पण आता दुबईच्या मैदानात त्यांना पाकिस्तानशी दोन हात करावे लागणार आहेत. गेल्या सामन्यात तुफानी शतक झळकवणाऱ्या स्मृती मानधनावर यावेळी सर्वांच्या नजरा असतील. हिंदुस्थानच्या संघाने आपले सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे आणि आता ते केवळ औपचारिकता म्हणून मैदानात उतरतील.
पाकिस्तान उपांत्य फेरीमधून बाहेर पडणार?
हिंदुस्थानचा संघ या सामन्यात एक प्रबळ दावेदार म्हणून उतरेल यात शंका नाही. हिंदुस्थानने पहिल्या दोन सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली असली तरी काही क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. पण आशियाई स्तरावर कोणताही संघ हिंदुस्थानच्या जवळपास पोहोचत नसल्याचे दिसत आहे. गेल्या वेळी हिंदुस्थानने श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामन्यात उपविजेतेपद पटकावले होते. दुसरीकडे पाकिस्तानने आपल्या सलामीच्या सामन्यात थायलंडला पराभूत केले आणि उपांत्य फेरीच्या शर्यतीत अजूनही कायम आहे. पण या सामन्यात जर पाकिस्तानचा पराभव झाला तर त्यांच्यावर उपांत्य फेरीच्या शर्यतीमधून बाहेर पडण्याची वेळ येऊ शकते.
पाकिस्तानला सुधारणा करण्याची गरज
हिंदुस्थानला आव्हान देण्यासाठी पाकिस्तानला आपल्या फलंदाजीत लक्षणीय सुधारणा करण्याची गरज आहे. फलंदाजीतील कमकुवतपणा ही संघाची जुनी समस्या आहे. या मोठय़ा सामन्यासाठी पाकिस्तान आपल्या अंतिम 11 खेळाडूंमध्ये काही बदल करू शकते. पण हिंदुस्थानच्या संघात कोणतेही बदल होण्याची शक्यता कमी आहे, पण रेणुका ठाकूर संघात परत येते की नाही याची उत्सुकता सर्वांना असणार आहे.
हिंदुस्थानी संघ चांगल्या फॉर्मात
हिंदुस्थानची सलामीवीर स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यादेखील उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. स्मृतीने हाँगकाँगविरुद्ध एक संस्मरणीय शतक झळकवत अनेक विक्रम मोडले आणि स्पर्धेतील इतर संघांना आपल्या फलंदाजीच्या क्षमतेचा संकेत दिला. दुबईच्या खेळपट्टय़ांवर फलंदाजी करणे सोपे राहिलेले नाही. फलंदाजांना खेळपट्टीचा वेग आणि उसळी समजून घेण्यासाठी आणि त्यानुसार आपल्या डावाची योजना आखण्यासाठी थोडा वेळ लागतो. स्मृती आणि शेफाली यांनीही गुरुवारी रात्री हीच रणनीती अवलंबली. मधल्या फळीत प्रतिका रावल, रिचा घोष आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांची भूमिका महत्त्वाची असेल. या तिघींनाही चांगल्या सुरुवातीचे मोठय़ा धावसंख्येत रूपांतर करता आलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर दबाव वाढत आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये यशस्वी ठरलेली रावल टी-20 फॉरमॅटच्या अपेक्षा पूर्ण करू शकलेली नाही. हिंदुस्थानचे सर्वच गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळेच संघाला मोठे विजय मिळवत उपांत्य फेरी गाठणे शक्य झाले आहे. गोलंदाजीच्या आक्रमणात नंदिनी शर्माचा समावेश हा हिंदुस्थानसाठी एक सकारात्मक पाऊल ठरला आहे. ती आपल्या क्षमतेनुसार कामगिरी करत असून, प्रमुख वेगवान गोलंदाज क्रांती गौरसोबत नव्या चेंडूने गोलंदाजी करत आहे.
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे
हिंदुस्थान : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, भारती फुलमाली, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टिरक्षक), जी. कमलिनी (यष्टिरक्षक), अरुंधती रेड्डी, प्रेमा रावत, राधा यादव, श्री चरणी, रेणुका ठाकूर, नंदिनी शर्मा, क्रांती गौड, प्रतिका रावल.
पाकिस्तान : फातिमा सना (कर्णधार), आयेशा जफर, ईमान नसीर, अयमान फातिमा, गुल फिरोजा, मोमिना रियासत, मुनीबा अली सिद्दिकी (यष्टिरक्षक), नाशरा संधू, सदफ शमास, सादिया इकबाल, सायरा जबीना, शवाल झुल्फिकार, तूबा हसन, उम्म-ए-हानी, वहीदा अख्तर.



























































