
>> पराग पोतदार
स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, जलसंधारण, अपारंपरिक ऊर्जा, डिजिटल तंत्रज्ञान आणि लोकसहभागाच्या माध्यमातून आदर्श ग्रामविकासाचा पाटोदा पॅटर्न उभा करणारे पाटोदा गाव. या ग्रामपंचायतीला विविध क्षेत्रांतील तब्बल 24 पुरस्कार मिळाले आहेत.
वाळूज परिसरातील पाटोदा ग्रामपंचायतीने पर्यावरणपूरक विकास, स्वच्छता, तंत्रज्ञान आणि लोकसहभाग यांची सांगड घालून आता राष्ट्रीय पातळीवर आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, जलसंधारण, अपारंपरिक ऊर्जा, डिजिटल तंत्रज्ञान आणि लोकसहभागाच्या माध्यमातून आदर्श ग्रामविकासाचा पाटोदा पॅटर्न उभा करणाऱया या ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पंचायत पुरस्कार कार्बन न्यूट्रल ग्रामपंचायत श्रेणीत देशात द्वितीय ाढमांक मिळाला आहे. नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या वेळी पाटोदा-गंगापूर नेहरी ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री किशोर दिवेकर, उपसरपंच कपिंद्र पेरे, ग्रामविकास अधिकारी पुंडलिक पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी व पदाधिकाऱयांनी पुरस्कार स्वीकारला. केंद्रीय ग्रामविकास व पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांचीही उपस्थिती होती.
पाटोदा ग्रामपंचायतीची आदर्श ग्रामविकासाची ओळख नवी नाही. माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या काळात `पाटोदा पॅटर्न’ राज्यभर चर्चेत आला. त्यानंतरही ग्रामपंचायतीने विविध नावीन्यपूर्ण उपाम सुरू ठेवत ही परंपरा कायम राखली.
गावातील कचरा व्यवस्थापन ही पाटोद्याची विशेष ओळख आहे. प्रत्येक घरातून ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित केला जातो. ओल्या कचऱयापासून कंपोस्ट तयार केले जाते, तर सुका कचरा वर्गीकृत करून त्याची विल्हेवाट लावली जाते. घराबाहेर कचरा टाकला जाऊ नये, यासाठी ग्रामपंचायतीने प्रभावी यंत्रणा उभी केली आहे. सांडपाण्यावर प्रािढया केल्यानंतरच ते नदीत सोडले जाते.
पर्यावरणपूरक जीवनशैलीलाही गावात प्रोत्साहन दिले जाते. अंत्यसंस्कारासाठी लाकडाऐवजी गोवऱयांचा वापर केला जातो. मृताच्या स्मरणार्थ झाड लावण्याची प्रथा आहे. गावात सौर दिवे आणि बायोगॅस प्रकल्प कार्यरत असून, वृक्षारोपणाला विशेष महत्त्व दिले जाते. वाढदिवसानिमित्त नागरिक व विद्यार्थ्यांना झाड भेट देऊन त्याच्या संगोपनाची जबाबदारीही सोपवली जाते. या गावात गिरणी असून या गिरणीत मोफत पीठ दळून दिले जाते. महिलांना सॅनिटरी पॅडही मोफत दिले जातात.
तंत्रज्ञानाचा वापर करून गावात शिस्त आणि सुरक्षितताही वाढवण्यात आली आहे. 2015 मध्ये सुमारे तीन लाख रुपये खर्चून सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात आली. सध्या ग्रामपंचायतीचे सुमारे 40 आणि ग्रामस्थांचे 60 पेक्षा अधिक, असे 100 हून अधिक कॅमेरे गावातील रस्ते, मुख्य प्रवेशमार्ग, धार्मिक स्थळे, शाळा आणि सार्वजनिक ठिकाणांवर नजर ठेवतात. त्यामुळे चोरीला आळा बसण्याबरोबरच रस्त्यावर कचरा टाकणाऱयांवरही नियंत्रण आले आहे. शाळेतील कामकाज आणि ग्रामपंचायत कार्यालयातील व्यवहारांवरही देखरेख ठेवणे शक्य झाले आहे.
आतापर्यंत ग्रामपंचायतीला विविध क्षेत्रांतील तब्बल 24 पुरस्कार मिळाले असून, 2007 पासून पुरस्कारांच्या माध्यमातून गावाला सुमारे चार कोटी रुपयांची कमाई झाली आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान आणि सावित्रीबाई स्वच्छ अंगणवाडी यांसारख्या पुरस्कारांनीही पाटोदाचा गौरव झाला आहे. पाटोद्याच्या या कामाची दखल देशाच्या सर्वोच्च पातळीवरही घेण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी `मन की बात’ कार्पामात पाटोदा ग्रामपंचायतीच्या उपामांचे कौतुक केले. त्यामुळे पाटोद्याचा पॅटर्न केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता देशभरातील ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी ठरला आहे.





























































