साहित्यस्मृती – प्रतिभावंत साहित्यिक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रशांत गौतम

7 सप्टेंबर हा मराठवाड्यातील जुन्या काळातील एक थोर प्रतिभावंत कथालेखक, लघुनिबंधकार, कवी, कादंबरीकार बी. रघुनाथ (भगवान रघुनाथ कुळकर्णी) यांचा स्मृतिदिन! प्रतिवर्षी विविध कार्यक्रमांनी साजरा होत असतो. स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांच्या साहित्याचा प्रस्तुत लेखात आढावा घेतला आहे. अल्प आयुष्य लाभलेल्या या सारस्वताचे स्मरण.

परभणीचे भूषण असणारे बी. रघुनाथ हे मराठवाड्याच्या मातीचा अस्सल साहित्यिक आवाज होते. निजामी राजवटीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत कविता, कथा, कादंबरी व लघुनिबंध या साहित्य प्रकारात मोजकेच, पण कसदार व अभिजात लेखन केले. भगवान रघुनाथ कुलकर्णी हे त्यांचे पूर्ण नाव. आपल्या अवघ्या 40 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी एक कवितासंग्रह, पाच कथा, सात कादंबरी आणि लघुनिबंध या साहित्य प्रकारांत उल्लेखनीय लेखन केले. निजामशाहीच्या काळातील मराठवाड्याचे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय वास्तव त्यांच्या साहित्याला आशयाची समृद्धी देणारे ठरले.

बी. रघुनाथांच्या साहित्याचा विचार करताना सर्वप्रथम जाणवते ते म्हणजे त्यांचे वास्तवाशी असलेले घट्ट नाते. त्यांनी कल्पनेच्या आभासी जगापेक्षा आपल्या सभोवतालच्या जीवनाला साहित्याचा विषय बनवले. सामान्य माणूस, त्याचे दैनंदिन जगणे, गरिबी, शोषण, सामाजिक विषमता, सत्तेचे दडपण आणि परिस्थितीशी चाललेला संघर्ष त्यांच्या लेखनातून प्रभावीपणे व्यक्त होतो. त्यामुळे त्यांचे साहित्य वाचताना त्या काळातील मराठवाड्याचे जिवंत चित्र डोळ्यांसमोर उभे राहते.
बी. रघुनाथ हे मूलत प्रभावी कथाकार म्हणून विशेष लक्षात राहतात. ‘साकी’, ‘फकिराची कांबळी’, ‘छागल’, ‘आकाश’ आणि ‘काळी राधा’ हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. ‘जनता लिंबे टाकळी’, ‘मुळी’ आणि ‘खाटकची गाय’ यांसारख्या कथांमधून त्यांच्या कथा लेखनाची वैशिष्ट्ये स्पष्ट होतात. त्यांच्या कथांमध्ये घटनाप्रधानता, वास्तवदर्शित्व, सामाजिक आशय आणि मानवी मनाचा सूक्ष्म वेध यांचा सुंदर मेळ आढळतो. त्यांच्या कथा मनोरंजनापेक्षा सामाजिक जाणीव निर्माण करणाऱया ठरतात. बी. रघुनाथांच्या साहित्याला वेगळेपण प्राप्त करून देणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मराठवाड्याची प्रादेशिकता. त्यांच्या लेखनात मराठवाड्याची माती, तेथील बोली, लोकजीवन, रूढी-परंपरा, सामाजिक संबंध आणि तत्कालीन राजकीय परिस्थिती यांचे दर्शन घडते.

निजामशाहीच्या काळात मराठवाड्याचे सामाजिक जीवन विशिष्ट स्वरूपाचे होते. त्या वातावरणातील दडपण, सरंजामी मानसिकता आणि सामान्य माणसाची घुसमट त्यांच्या साहित्यामधून जाणवते. मराठीबरोबरच उर्दू भाषेच्या सहवासातून निर्माण झालेल्या भाषिक वातावरणाची छापही त्यांच्या लेखनात दिसते. त्यामुळे त्यांच्या भाषेला स्थानिकतेचा अस्सल गंध प्राप्त झाला आहे.

कथेबरोबरच बी. रघुनाथांनी कादंबरी या साहित्य प्रकारातही महत्त्वपूर्ण लेखन केले. ‘हिरवे गुलाब’, ‘बाबू दडके’, ‘उत्पात’, ‘म्हणे लढाई संपली’, ‘जगाला कळलं पाहिजे’ आणि ‘आडगावचे चौधरी’ या त्यांच्या कादंबऱया प्रसिद्ध आहेत. कादंबऱयांमधून त्यांचा सामाजिक पट अधिक व्यापक होतो. बदलती मूल्यव्यवस्था, युद्धाचे परिणाम, आर्थिक-सामाजिक परिवर्तन आणि जुन्या व्यवस्थेचा ऱहास यांचे चित्रण त्यांच्या कादंबऱयांत आढळते. विशेषत बदलत्या काळामुळे पारंपरिक सामाजिक रचना कशी हादरते, याचे भान त्यांच्या लेखनात दिसते.

बी. रघुनाथ हे संवेदनशील कवीही होते. ‘आलाप आणि विलाप’ आणि ‘पुन्हा नभाच्या लाल कडा’ हे त्यांचे कवितासंग्रह त्यांच्या काव्यप्रतिभेची साक्ष देतात. त्यांच्या कवितेत वैयक्तिक भावविश्वाबरोबरच सामाजिक वास्तवाची जाणीव आहे. निसर्ग, मानवी दुःख, जीवनातील संघर्ष आणि आशा-निराशेच्या छटा त्यांच्या कवितेत आढळतात.

कथाकाराच्या वास्तवदर्शी नजरेबरोबरच कवीची भावुकता त्यांच्या कवितेत दिसते. त्यामुळे त्यांच्या साहित्य व्यक्तिमत्त्वाला एकाच प्रकारची चौकट लावता येत नाही. बी. रघुनाथांच्या लेखनाची भाषा सहज, प्रवाही, नेमकी आणि प्रसंगानुरूप आहे. त्यांच्या भाषेत अलंकारिक बडेजावापेक्षा जीवनानुभवाला महत्त्व आहे. स्थानिक शब्दप्रयोग आणि मराठवाडी भाषेचा बाज त्यांच्या लेखनाला अस्सलपणा देतो. संवादांमधून पात्रांचे सामाजिक स्थान, मानसिकता आणि परिसर सहज उलगडतो. त्यांच्या लेखनात करुणा आहे, पण दयाभाव नाही. आक्रोश आहे, पण कृत्रिम नाटकीपणा नाही. सामाजिक जाणीव आहे, पण उपदेशात्मकता नाही. हेच त्यांच्या लेखनाचे मोठे सामर्थ्य म्हणावे लागेल. बी. रघुनाथांचे साहित्य म्हणजे एका व्यक्तीच्या प्रतिभेची निर्मिती एवढेच त्याचे महत्त्व नाही. ते एका संपूर्ण प्रदेशाच्या जीवनाचे साहित्यिक प्रतिबिंब आहे.

अल्पायुष्यात त्यांनी निर्माण केलेले साहित्य आजही अभ्यासक आणि रसिकांना आकर्षित करते, याचे कारण त्यांच्या लेखनातील जिवंतपणा आणि वास्तवाशी असलेली प्रामाणिक बांधीलकी होय. बी. रघुनाथांनी मराठवाड्याच्या अनुभवविश्वाला मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहात एक स्वतंत्र आवाज दिला. म्हणूनच ते केवळ मराठवाड्याचे साहित्यिक नव्हे, तर मराठी वास्तववादी आणि प्रादेशिक साहित्यपरंपरेतील एक महत्त्वाचे शिल्पकार म्हणून स्मरणात राहतात.